Climate change : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक आणि फळबागांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या जास्त तापमान व पावसाची उघडीप या दोन्हींचा विचार करून पिकांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस पिकासाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की, गरजेनुसार पाणी द्यावे. तणनियंत्रणासाठी खुरपणी करावी. जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला, तर रोगट पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसीफेट यापैकी कोणतेही एक औषध योग्य प्रमाणात फवारावे. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोलची फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी.
सध्या हळदीची काढणी, उकडणे आणि वाळवणीची कामे सुरू असून, पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची सुरक्षित साठवणूक करणे आवश्यक आहे. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार आठवड्याच्या अंतराने सिंचन द्यावे. शक्य असल्यास तूषार सिंचनाचा वापर करावा. वेळेवर पेरणी केलेल्या तीळ पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागांमध्ये वाढत्या तापमानामुळे आंबा, संत्रा व मोसंबी बागांमध्ये फळगळ दिसून येत आहे. यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी गरजेनुसार पाणी द्यावे. फळगळ थांबवण्यासाठी ००:००:५० आणि जिब्रेलिक ॲसिड यांची फवारणी करावी. मृग बहाराच्या संत्रा/मोसंबी बागांसाठी ००:५२:३४ च्या फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.
नवीन लागवड केलेल्या आंबा, केळी आणि चिकू झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली द्यावी आणि झाडांच्या आळ्याभोवती आच्छादन करावे. केळीच्या झाडांना घड लागल्यास काठीचा आधार द्यावा आणि तयार घडांची त्वरित काढणी करावी.
या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक व फळबागांचे व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात वाढ आणि नुकसानात घट साधता येईल.












