देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन दरात चढ उतार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापेंड आणि सोयाबीन चे वायदे आज वाढले होते. तर देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात आज काहीशी वाढ झाली आहे .
सोयाबीनला आज सरासरी 4500 ते 4900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरामध्ये काहीशी वाढ करून पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला . देशात यंदा दुष्काळी स्थिती असूनही सोयाबीनच्या दरात चांगली वाढ दिसून येत आहे.
मागील काही दिवसापासून तुरीच्या भावामध्ये वाढ झाली आहे. तुरीची लागवड कमी झाली असून पिकांना दुष्काळाचा फटका बसला आहे. यामुळे तुरीचे उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून, चांगला उठाव तुरीला मिळत आहे . तुरीला सरासरी 11000 ते 12000 रुपये प्रतिक्विंटल च्या दरम्यान भाव मिळत आहेत.
देशातील बाजारात कांद्याचे भाव सध्या दबावतच आहेत. बाजार 1300 ते 2000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र दिवसेंदिवस बाजारातील कांदा आवक कमी होत आहे.बाजारामध्ये कांदाची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाने खंड दिल्यामुळे खरिपातील पिकाचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला
बाजारात टोमॅटोचे भाव घसरले आहे. बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दरावर दबाव आला असून त्यातच सरकारने टोमॅटो आयातीचा मानसिकता दबाव बाजारावर टाकला होता यामुळेच टोमॅटोचे भाव महिनाभरामध्ये निम्म्यावर आले आहेत. सध्या टोमॅटोला 1700 ते 2200 रुपये भाव मिळत आहे . टोमॅटोचे दर पुढील काळातही याच पातळीवर दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्य्कत केला.
कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलीच तेजी दिसून आली आहे. देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे, मात्र बाजार समितीतील व्यवहार थंडवल्याने बाजार स्थिर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे आज 11 महिन्यातील उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
अमेरिका व चीन या दोन महत्त्वाच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे . कृषी विभागाच्या मते चीनमधील कापूस पिकांना यावर्षी पूर आणि अतिउष्णतेचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही लागवड कमी केली आहे . त्यामुळे चीनमधील कापूस उत्पादन हे कमी राहणार आहे.
परंतु चीनमध्ये कापूस वापर येत्या हंगामात वाढणार असून चीनची कापूस आयात वाढून आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराला आधार मिळणार आहे. देशातील बाजार समितीमध्ये सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल 7000 ते 8000 रुपयांचा भाव मिळत आहे .तर माहितींमध्ये कापसाला 61 हजार 800 रुपयांचा भाव मिळाला देशातील कापूस उत्पादन यंदा घटणार आहे.