Unseasonal rain : मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण; नागपूर, विदर्भात प्रभावी धडक अपेक्षित…

Unseasonal rain : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात अनिश्चितता निर्माण झाली आहे. या वादळाचा प्रभाव राज्यातील अनेक भागांवर दिसून येणार असून, नागपूर व विदर्भ परिसरात विशेषतः ३० ऑक्टोबरपासून प्रभावी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोंथा वादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीवर ८०–८५ कि.मी./तास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने सरकत नागपूर परिसरावरून पुढे जाणार आहे. या हालचालीमुळे राज्यात ५ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण आणि हलका ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगाळलेला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता अधिक असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, मुंबईपासून सुमारे ६५० किमी अंतरावर डिप्रेशन सक्रिय असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यांवर जाण्याचे टाळावे, वादळी वाऱ्यांपासून सावधगिरी बाळगावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी हवामान अपडेट्सवर सतत लक्ष ठेवावे, तसेच पिकांची काढणी, साठवण आणि वाहतूक नियोजन काळजीपूर्वक करावे, अशी विनंती कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. मोंथा वादळाचा परिणाम केवळ पावसापुरता मर्यादित नसून, विजेच्या लपंडावामुळे जनजीवनही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत