
Employment opportunities : राज्यात शेतकरी कुटुंबातील मुले आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी येणार आहे. राज्य शासन लवकरच विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या काळात प्रत्येक विभागाने रिक्त पदांची माहिती निश्चित करायची आहे. त्यानंतर शासन ‘मेगा भरती’ राबवणार आहे. भरती प्रक्रियेत कोणतेही अडथळे न येता पारदर्शकपणे ही भरती होईल.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व ग्रामीण तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या मिळवणे ही मोठी संधी असते. त्यामुळे रिक्त पदांची ही भरती त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मागील काळात राज्य सरकारने ७५ हजार पदांसाठी भरती जाहीर केली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे एक लाखांपेक्षा अधिक पदे भरली गेली आहेत.
विधानसभेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्या ६,८६० पदांवर जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही काही कर्मचारी काम करत आहेत. त्यांना सध्या पदावरून कमी करण्यात येणार नाही, पण त्यांच्या जागा पुढे रिक्त झाल्यावर त्या नवीन उमेदवारांद्वारे भरल्या जातील.
जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकार ब्लॉकचेन पद्धतीचा वापर करणार आहे. यामुळे कागदपत्रांची पडताळणी अधिक वेगाने होईल आणि भरतीसाठी अर्ज करणे सोपे होईल.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांच्या पदांवरील वारसाहक्क भरतीवरील स्थगिती हटवली असून, आता लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ही भरती होणार आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदांवरही लवकरच भरती केली जाणार आहे.
या मेगा भरतीतून शेतकऱ्यांची मुले, ग्रामीण युवक, आदिवासी तरुण आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे ही भरती अनेकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.