Rainy season : पावसाळ्यात दूध उत्पादन, रोगप्रतिकार आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाय…

rainy season : पावसाळी हवामानात शेतीसारखेच पशुपालनही आव्हानात्मक ठरते. सतत आर्द्रता, पावसाचे पाणी, माश्या, गोचीड, जंत आणि वाढती रोगप्रवणता यामुळे गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमताही प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरीने दिलेल्या सल्ल्यानुसार पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेणे गरजेचे ठरते.

सर्वात आधी गोठ्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे. पावसाळ्यात गोठ्यातील जमिनीवर ओलसरपणा राहतो, ज्यामुळे जनावरांच्या खुरांमध्ये माती साचते, ती घसरतात व जखमी होतात. त्यामुळे गोठ्याचा निचरा चांगला ठेवावा. लघवी व विष्ठेच्या अमोनियामुळे वास व डोळ्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून वेळोवेळी गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. जनावरांचे खुरे दर आठवड्याला तपासावेत.

पावसाळ्यात गोचीड, माश्या, डास यांचा त्रास वाढतो. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. माश्यांच्या चाव्यांमुळे जनावरांना वेदना होतात, व त्यामुळे ते खाण्याचे प्रमाण कमी करतात. या कीटकांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकीय सल्ल्याने गोठ्यात जंतुनाशक फवारणी करावी.

ओलसर हवेमुळे जनावरांना पोटदुखी, जुलाब, कासदाह, त्वचारोग इत्यादी आजार होऊ शकतात. म्हणून वेळेवर लसीकरण करणे व जंतनाशक औषधे देणे आवश्यक आहे. दुभत्या गायी, म्हशी यांची कास स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक द्रावणाचा वापर दूध काढण्यापूर्वी आणि नंतर करावा.

शेळ्या आणि मेंढ्यांसाठी गोठा कोरडा आणि वारा पासून सुरक्षित असावा. पावसामुळे गिळगिळीतपणा निर्माण होतो, त्यामुळे शेळ्यांच्या राहत्या जागेत चुना भुरभुरावा. तसेच आजारी, गाभण व लहान शेळ्यांना वेगळी जागा द्यावी. मेंढ्यांमध्ये नीलज्वर रोगाचा धोका असतो, म्हणून लसीकरण गरजेचे आहे. मेंढपाळांनी लोकर कातरणी वेळेवर करावी आणि सहा महिन्यांचे कोकरूंचे वजन दर महिन्याला तपासावे.

कुक्कुटपालन करणाऱ्यांनी खाद्य साठवताना विशेष काळजी घ्यावी. अयोग्य हाताळणीमुळे खाद्यामध्ये बुरशी होऊन रोगांचा प्रादुर्भाव होतो. खाद्य कोरड्या, हवेशीर खोलीत ठेवा आणि फक्त आठवड्याचा साठा ठेवा. ओले खाद्य वापरणे टाळावे.

पावसाळा ही पशुधनासाठी अत्यंत नाजूक वेळ असते. थोडासा निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानीला कारण ठरू शकतो. त्यामुळे पशुपालकांनी हवामान बदल लक्षात घेत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.