Crop management : असे करा कांदा रोपवाटिका आणि टोमॅटोचे व्यवस्थापन..

Crop management : सध्या मध्य महाराष्ट्रात पावसाळा सक्रिय असून ढगाळ हवामान आणि मध्यम पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर कांदा व टोमॅटो या महत्त्वाच्या भाजीपाला पिकांसाठी शेतकऱ्यांनी विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

कांद्याची रोपवाटिका तयार करताना शेतकऱ्यांनी २ गुंठे क्षेत्रावर प्रत्येकी एक एकर लागवडीसाठी पुरेशी रोपे तयार करावीत. रोपांची जोमदार वाढ व्हावी यासाठी प्रति एकर २-३ किलो बियाणे पुरेसे आहे. बियाण्यांवर पेरणीपूर्वी २ ग्रॅम कार्बेन्डाझीम बुरशीनाशक लावावे, जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून सुरुवातीपासूनच संरक्षण मिळेल.

रोपवाटिका तयार करताना जमीन समतल आणि चांगल्या निचऱ्याची असावी. पावसामुळे पाणी साचू नये म्हणून उंच वाफे तयार करावेत. झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी चालते. वाफ्यांना गरजेनुसार १-१.२ मीटर रुंदी व १०-१५ सें.मी. उंची द्यावी. पेरणीनंतर नत्र व स्फुरद खत दिल्यास रोपे मजबूत बनतात. रोपे उगवण्याआधी पेंडीमिथालिन फवारणी करून तण नियंत्रण करावे. रोप उगवलेल्या २० दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी.

टोमॅटोचे व्यवस्थापन:
टोमॅटो पिकासाठी पावसाळी हवामानात फळ पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाभोवती झेंडू व मक्याच्या आंतरपीक ओळी लावाव्यात. झेंडूच्या फुलांमुळे अळी आकर्षित होते व टोमॅटो पीक सुरक्षित राहते. तसेच झेंडूचे झाड सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठीही उपयोगी ठरते.

टोमॅटोच्या वाढीच्या अवस्थेनुसार खते व पाणी व्यवस्थापन करावे. फुलोऱ्याच्या वेळी अति नत्र वापर टाळावा. सेंद्रिय खतांचा वापर संतुलित प्रमाणात करावा. पाऊस झाल्यावर मुळांच्या आजारांची शक्यता वाढते, त्यामुळे फवारणीत बुरशीनाशकांची मदत घ्यावी.

टोमॅटो सध्या अर्धवट वाढीच्या अवस्थेत असल्याने फांद्यांचा बळकटपणा राखण्यासाठी बांधणी करावी. यामुळे पावसामुळे झाडे आडवी होण्याचा धोका टळतो. पानावरील करपा रोग व फळांवरील कुज थांबवण्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर करावा.

पावसाळ्यातील बदलत्या हवामानात कांदा व टोमॅटोच्या उत्पादनात घट होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रोग व कीड व्यवस्थापनाबरोबरच पाण्याचा निचरा, खतांचे संतुलित व्यवस्थापन व रोपांची निगा यावर अधिक भर द्यावा. यामुळे खरीप हंगामात अधिक उत्पादन मिळवणे शक्य होईल.