Soybean crop : जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर परिणाम; हा उपाय त्वरित करा..

soybean crop : मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पिकांच्या मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण क्रिया मंदावली आहे. यामुळे सोयाबीनच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी तातडीचे उपाय सुचवले आहेत. या उपायांमध्ये सर्वात आधी शेतात साचलेले अतिरिक्त पाणी निचरा करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पाण्यात भिजलेली जमीन आणि आद्र्र हवामानामुळे गोगलगायीचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून मेटाल्डिहाईड हे गोगलगायनाशक २ किलो प्रति एकर दराने शेतात, बांधावर आणि बांधाच्या कडेला सायंकाळच्या वेळेस पसरवावे, असे सुचवण्यात आले आहे.

सध्या सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून याच काळात शेंगा पोखरणाऱ्या अळ्या, पाने खाणाऱ्या कीटक, तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी:

* क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% – 60 मिली (3 मिली/10 लि. पाणी)
* इंडाक्झाकार्ब 15.8% – 140 मिली (7 मिली/10 लि. पाणी)
* असिटामाप्रीड + बाईफॅन्थ्रीन – 100 मिली (5 मिली/10 लि. पाणी)
* आयसोसाक्लोसिरम 9.2% – 240 मिली (12 मिली/10 लि. पाणी)

तसेच हवामानामुळे शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. यासाठी पुढील बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एकाची फवारणी करावी:

* टेब्युकोनॅझोल 10 %+ सल्फर 65% – 500 ग्रॅम प्रति एकर
* टेब्युकोनॅझोल 25.9% – 250 मिली
* पायरोक्लोस्ट्रोबीन 20% – 150 ते 200 ग्रॅम
* पायरोक्लोस्ट्रोबीन + इपिक्साकोनाझोल – 300 मिली

शेतात जैविक उपायांनाही महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे ट्रायकोडर्मा किंवा ‘बायोमिक्स’ हे जैविक बुरशीनाशक 4 किलो प्रति एकर याप्रमाणे शेणखतामध्ये मिसळून किंवा पाण्यातून आळवणी करावी.

तज्ज्ञांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. फवारणी करताना दूषित पाणी वापरू नये आणि पाण्याचे प्रमाण शिफारसीप्रमाणे ठेवावे. शेतकऱ्यांनी एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर न करता आलटून पालटून फवारणी करावी.