Cotton fields : जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका..

Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. भगवान आसेवर, डॉ. गडदे आणि श्री मांडगे यांच्या मते, सर्वप्रथम शेतात साचलेले पाणी निचरा करण्यासाठी प्रत्येक दोन ओळीमध्ये छोटा चर तयार करावा. पाऊस थांबताच वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. आकस्मिक मर दिसत असल्यास प्रति १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम पांढरा पोटॅश आणि २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड मिसळून तयार द्रावण १०० मिली प्रति झाड या प्रमाणात मुळाशी आळवणी करावी.

झाडाची वाढ पूर्ववत सुरू होण्यासाठी ६० दिवसांनंतर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू कपाशीकरिता ३१ किलो तर बागायतीसाठी ५१ किलो निमकोटेड युरिया प्रति एकर देण्याची शिफारस आहे. नैसर्गिक पातेगळ होत असल्यास एनएए हे संजीवक ४० मिली प्रति १८० लिटर पाणी (२.५ मिली प्रति १० लि.) फवारावे.

बोंडावर चिकटलेली सुकलेली पाकळी हाताने काढून टाकावी. या ठिकाणी ओलसरपणामुळे बुरशी वाढते आणि आतील बोंड सडते. यावर उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बोंडावर बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी पुढील बुरशीनाशके फवारावीत:
* पायरोक्लोस्ट्रोबीन 20% – 10 ग्रॅम
* मेटीराम + पायरोक्लोस्ट्रोबीन – 20 ग्रॅम
* प्रोपीकोनॅझोल 25% – 10 मिली
* ॲझोक्सिस्ट्रॉबीन + डायफेनोकोनाझोल – 10 मिली
* प्रोपीनेब 70% – 25-30 ग्रॅम

ही फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करावी. ढेकण्या व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन निरीक्षण व नियंत्रणासाठी उपाय करावेत.