
Tur cultivation advice : जास्त पावसामुळे तुर पिकांमध्ये जमिनीत पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तुर हे पीक पावसास अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यामध्ये मुळे सडण्याचा धोका वाढतो.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम पाणी शेताबाहेर निचरा करावा. रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत. त्याठिकाणी आणि चारही बाजूंनी १ मीटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. मर रोगाची सुरुवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम + युरिया २०० ग्रॅम + पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे तयार द्रावण १०० मिली प्रति झाड मुळाशी घालावे.
जैविक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा किंवा ‘बायोमिक्स’ ४ किलो प्रति एकर या प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून आळवणी करावी. पिकाची सुधारलेली वाढ आणि मुळांची प्रतिकारशक्ती यामुळे रोगप्रसार कमी होतो.
फवारणी करताना हवामानाचा अंदाज घ्यावा आणि पाणी शिफारसीप्रमाणे वापरावे. पावसाच्या दरम्यान रोगप्रसार झपाट्याने होऊ शकतो, त्यामुळे उपाययोजना उशीर न करता लागू कराव्यात.