
Farmers scheme : शेतकरी बांधव आणि सामान्यांसाठी एक सावधानतेचा इशारा आहे. योजना किंवा इतर कुठल्या सरकारी उपक्रमाचा लाभ घेताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या डिजिटल युगात सरकारी योजनांचे नाव वापरून बनावट संकेतस्थळांद्वारे शेतकरी आणि सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतीसाठी कर्ज, शिष्यवृत्ती, मोफत टॅबलेट, जमीन नोंदणी किंवा इतर सरकारी सहाय्य मिळवून देतो, असे सांगत ही संकेतस्थळे लोकांकडून खासगी माहिती गोळा करतात. अनेकदा ही माहिती बँक खात्याशी संबंधित असते आणि त्याद्वारे आर्थिक फसवणूक घडते.
सरकारने अशा काही बनावट संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे. या संकेतस्थळांवरून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. ही संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत:
1. centralexcisegov.in/aboutus.php
2. register-for-your-free-scholarship.blogspot.com
3. kusmyojna.in/landing
4. kvms.org.in
5. sajks.com/about-us.php
6. register-form-free-tablet.blogspot.com
7. nragov.online
8. betibachaobetipadao.in
9. pibfactcheck.in
10. samagrashiksha.org
ही सर्व संकेतस्थळे आकर्षक घोषणांद्वारे शेतकऱ्यांना भुलवतात. काही वेबसाइटवर ‘प्रधानमंत्री सन्मान निधी’साठी अर्ज, काहींवर शिष्यवृत्ती किंवा महिलांसाठी ‘बेटी बचाओ’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचे फॉर्म टाकलेले असतात. पण हे सर्व खोटे असून, या माध्यमातूनच बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवली जाते आणि फसवणूक केली जाते.
शेतकरी व नागरिकांनी अधिकृत माहिती फक्त भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच घ्यावी. जसे की india.gov.in किंवा संबंधित मंत्रालयाची वेबसाईट. कोणतीही योजना खरोखर सुरु आहे का, हे स्थानिक कृषी अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाकडूनही तपासता येते.
या लिंक्स सोशल मीडियावर फॉरवर्ड करून येतात, म्हणून त्यावर सहज विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका असल्यास तज्ञ सल्ला घ्यावा. सावध रहा, सतर्क राहा, आणि इतरांनाही या फसवणुकीबद्दल जागरूक करा, असे आवाहन सरकारने केले आहे.