नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पिकविमा संदर्भात मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ,यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे . येत्या 31 ऑगस्ट पूर्वी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.पुढील आठवड्यात मुंबई येथे पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पिकविमा कंपनीचे अधिकारी,पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा..
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आली होती. यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. त्यांनंतर प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज सकाळी दिल्लीला रवाना होण्याअगोदर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी माजी आमदार जयंत जाधव ,आमदार हिरामण खोसकर, उपस्थित होते.
इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ..
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नामध्ये आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते. धनंजय मुंढे यांना याबाबतची माहिती मिळताच कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क साधला . तसेच शेतकऱ्यांना त्यांच्याकडून देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार मान्य केले आहे. पीक विम्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास ५ लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .
कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना फायदा..
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ५ लाख 88 हजार पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती यासाठी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते. त्याच्या वाटपाची कारवाई सुरु आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोकळा झाला आहे.
दरम्यान, पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आ. हिरामण खोसकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.नितीन पवार, आ.सुहास कांदे, माजी आमदार जयंत जाधव आ.दिलीपराव बनकर, आ.सरोजताई अहिरे,आदींनी पीक विम्याच्या संदर्भात आपल्याकडे विषय उपस्थित केले होते असे मुंडे म्हणाले. या सर्वांसह मुंबई येथे लवकरच बैठक घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.