Planting strawberries : शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान मिळणार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा ..

स्ट्रॉबेरी उत्पन्न हे सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते . तसेच महाबळेश्वर मधील वातावरण थंड असल्यामुळे याभागातील स्ट्रॉबेरी अत्यंत चांगल्या दर्जाची असते व येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला सरकार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करून स्ट्रॉबेरी पिकाच्या अनुदानावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रक्रिया उद्योग शेत पिकावर उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच जास्त फायदा होईल. यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मागेल त्याला शेततळे,एक रुपयात पीक विमा , ठिबक सिंचन, अशा अनेक योजना राज्य सरकार राबवीत आहेत. त्याचबरोबर सरकारने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेतला.

शेतकऱ्यांना शेती करत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे असल्यामुळे या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबीची पूर्तता केली जाईल . सर्वांनी झाडे लावली पाहिजेत व त्याचे संवर्धनही केले पाहिजे,यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मदत होईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाबळेश्वर आणि जावळी हे दोन्ही डोंगरी तालुके आहेत. येथील लोक कामासाठी मुंबई येथे जातात . नोकरीच्या शोधा मध्ये शहरात जातात त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळावेत यासाठी पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवरही सरकार भर देत आहे. तसेच येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू हे नगदी पीक आहे बांबूपासून फर्निचर,इथेनॉल निर्मिती करता येते.

सरकार बांबू शेतीसाठी अनुदान देत आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले .महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली . पाचगणी मधील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *