राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये अजूनही खरीपाच्या नवीन कांद्याची आणि लेट खरीपाच्या कांद्याची आवक कमीच होताना दिसत आहे. त्यामुळे लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजारसमितीत कांद्याच्या किंमतीत अगदी थोडीच घसरण पाहायला मिळत आहे. येणाऱ्या आठवड्यातही कांद्याच्या किंमती बऱ्यापैकी टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तनाचा कांदा पुण्याच्या बाजारात यायला सुरूवात झाली असून त्याची किंमत सध्या ४० रुपये क्विंटल आहे. यंदा पावसाने आणि खराब हवामानाने खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे कांदा आयात करूनही कांद्याच्या दरात फार मोठी घसरण होण्याची शक्यता दिसत नाही.
काल दिनांक २६ नो्व्हेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याची अवघी ७२ क्विंटल आवक होऊन सरासरी ४७०० रुपयांचा भाव मिळाला, तर लाल कांद्याला मात्र २०० रुपयांनी वाढून सरासरी ४१०० रुपयांचा भाव मिळाला. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक चांगली होत असल्याने सरासरी २७०० रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.
मागील आठवड्यात म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याच्या सर्वधिक किंमती होत्या. या ठिकाणी कांद्याला सरासरी ४८४५ रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळत होता. दुसरीकडे सोलापूर बाजारात कांद्याच्या सरासरी किंमती २३०० रुपये प्रति. क्विंटल इतक्या होत्या. या किंमती लाल कांद्यासाठी होत्या. तर पिंपळगाव बाजारात लाल कांद्याच्याही किंमती बऱ्यापैकी होत्या.
दरम्यान देशपातळीवर कांद्याच्या आवकेमध्ये मागील आठवड्यात ८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे लासलगाव बाजारातील कांद्याच्या सरासरी किंमती मागील आठवड्यात ४७८० रु प्रति क्विंटल इतक्या राहिल्या. त्या आधीच्या किंमतीच्या तुलने कांदा बाजारभावात मागच्या आठड्यात २ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले, अशी माहिती कृषी विभागच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षातील तज्ज्ञांनी दिली आहे.