पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी निवड झाल्याचे सांगत फसवे संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार राज्यात सुरूच आहेत. परंतु सौर पंपाच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती बनावट संकेतस्थळ करणाऱ्यांकडे जातीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . तसेच याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ३, ५, ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत.
राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास १ लाख ४ हजार ८२३ सौरकृषिपंपांसाठी मान्यता दिली. महाउर्जा कडून आत्तापर्यंत ७५ हजार ७७८ सौरकृषीपंप बसवले आहेत. काही दिवसांपासून मात्र कुसुम सोलर योजनेच्या सरकारी संकेतस्थळासारखे हुबेहूब नकली संकेतस्थळ तयार करून योजनेच्या लाभासाठी अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना स्वयं सर्वेक्षण करण्याबाबत बनावट संदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत.
विशेष महाउर्जाकडे अर्ज करताना शेतकऱ्यांच्या अर्जाचा 10 अंकी एमके नंबर ,आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, पत्ता ,फोटो ही सर्व माहिती दिली जाते . ती सर्व माहिती नकली संकेतस्थळ करणाऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ शेतकरी आणि सरकारी संकेतस्थळाकडे गुप्त असलेली माहिती नकली संकेतस्थळ तयार करण्याकडे जातेच कशी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
तालुका पातळीवरूनही सर्वेक्षण करायचे असून ,त्यासाठीही एक ते दीड हजार रुपये थेटपणे मागविले जात आहेत, त्या लोकांकडेही अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या आल्या कुठून अशी शंकाही आता शेतकरी उपस्थित करत आहेत. तसेच सरकारी यंत्रणेतूनच यात कोणी सामील तर नाही ना अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. माहिती बाहेर गेली कशी याची वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी शेतकरी करत आहेत.
पंतप्रधान कुसुम योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. या प्रकारातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या संदेशापासून सावध राहावे .
-लीना कांबळे, जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा
कुसुम सोलर साठी निवड झाल्याबाबत मला दोन वेळा मेसेज आला पैसे भरण्यास सांगितले मला फसव्या संदेशाबाबत माहिती असल्यामुळे मी पैसे भरले नाही. मात्र अनेक शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक झाली. सर्व माहिती ,मोबाईल नंबर या बनावट लिंक तयार करणाऱ्यांकडे जाते कशी ,असा प्रश्न आहे.
– विलास नलगे,शेतकरी खेड तालुका कर्जत जिल्हा नगर