
Wind energy company : धाराशिव जिल्ह्यात २२ पवन ऊर्जा कंपन्यांकडून ८४३ पवनस्तंभाचे काम सुरू आहे. या कंपन्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले.
तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून मारहाण प्रकरणावर विधानसभा सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, कंपन्यांनी जमीन भाडेपट्टीने घेण्याच्या दस्तामध्ये शेतकऱ्यांच्या बनावट सह्या वापरून खोटी शपथपत्रे सादर केली, काही प्रकरणांत शेतकऱ्यांना खोटे धनादेश देऊन फसवले अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराबाबत पोलीस चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित जिल्हास्तरीय समितीकडे ११३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, उपविभागीय सनियंत्रण समितीकडे २०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारींपैकी २१० तक्रारी निकाली काढल्या असून उर्वरित १०३ तक्रारीवर कार्यवाही सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची लवकरच चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यांची खबरदारी घेतली जाईल. या प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.