
Crop care : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग या पिकांसाठी पेरणीचे नियोजन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
मका पेरणीसाठी सपाट वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीचे अंतर लवकर पिकणाऱ्या जातींसाठी ६०x२० सेमी, तर उशिरा पिकणाऱ्या जातींसाठी ७५x२० सेमी असावे. बीजप्रक्रिया करून १५-२० किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. पेरणी ४-५ से.मी. खोलीवर करावी. अॅट्राटॉप नावाचे तणनाशक पेरणीनंतर जमिनीवर फवारावे.
सोयाबीन पेरणी वाफश्यावर करावी. ४५x५ से.मी. अंतर ठेवून, पेरणी ४ से.मी.पेक्षा खोल न करता करावी. बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. सोयाबीनसोबत तुरीच्या ओळींचे ३:१ अथवा ४:२ प्रमाणात आंतरपीक घेण्याचे फायदे जास्त असतात.
बाजरी पेरणीसाठी ३०x१० से.मी. अंतर राखावे. पेरणी सपाट वाफ्यावर किंवा सरीवरंबा पद्धतीने करावी. बीजप्रक्रिया करून ३-४ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. रासायनिक खतांबरोबर जीवाणूसंवर्धकांचाही वापर करावा.
भुईमूग पेरणी ३०x१० सेमी अंतरावर पाभरीने किंवा टोकण पद्धतीने करावी. १५ जून ते १५ जुलै हा योग्य कालावधी असून बीजप्रक्रिया न करता पेरणी केल्यास बुरशीजन्य रोग वाढू शकतो. त्यामुळे बुरशीनाशक आणि रायझोबियमसारखे जैविक घटक लावणे आवश्यक आहे.
या सर्व पिकांसाठी पेरणी करताना पाण्याचा निचरा योग्य असावा. जिथे पाणी साचते अशा जमिनीमध्ये पेरणी टाळावी. पेरणीचे काम पावसाच्या अंतराच्या गणनेनुसार शक्यतो ७ जुलैपूर्वी पूर्ण करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, कारण उशिराने पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.