Heat wave : आज दिनांक १५ एप्रिलपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागांत उष्णतेची लाट आणि उष्णतेच्या तीव्रतेचा इशारा देण्यात आला आहे. तर ओडिशा, पूर्व भारत आणि ईशान्य भारतात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून काही भागांत गारपीट होण्याचाही अंदाज आहे. विशेषतः ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशात सध्या अनेक हवामान प्रणाली सक्रिय असून त्यांचा प्रभाव अनेक भागांमध्ये जाणवत आहे. मध्य प्रदेश, बांगलादेश व मान्नारचा आखात या ठिकाणी सायकोनिक सर्क्युलेशन असून त्याचा प्रभाव ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड आदी भागांवर होणार आहे. १६ ते १८ एप्रिल दरम्यान हिमालयीन भागात जोरदार पावसाचा व हिमवृष्टीचा अंदाज आहे.
राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागांत १६ ते १९ एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून येत्या काळात ३ ते ५ अंशांनी तापमान वाढण्याचा इशारा आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दुसरीकडे केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता असून गारपीटसारखे प्रकार होऊ शकतात.
महाराष्ट्रात असे आहे हवामान:
महाराष्ट्रात १५ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ३० ते ५० किमी प्रतितास दरम्यान असू शकतो. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. विदर्भात १५ ते १७ एप्रिलदरम्यान वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील अंतर्गत भागात येत्या ५ दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे उष्णतेची तीव्रता जाणवू शकते. पण सध्या उष्णतेच्या लाटेचा थेट इशारा दिलेला नाही. मात्र, दुपारी जास्तीत जास्त तापमान ४० अंशाच्या आसपास राहू शकते.
गेल्या काही दिवसांत पुणे, नाशिक, सोलापूर, अकोला, नागपूर या भागांमध्ये सापेक्ष आर्द्रतेसह उष्ण हवामान जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी शेतकाम टाळावे आणि पीक व कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.












