Maharashtra rain alert : महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता..

Maharashtra rain alert:  आज, सोमवार, २१ जुलै (लहान एकादशी) पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पुढील आठवडाभर, म्हणजेच २८ जुलै (पहिला श्रावणी सोमवार) पर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे.

माजी हवामानशास्त्रज्ञ, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सोमवार, २१ जुलै २०२५ पासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित:
पुढील आठवड्यात एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

यामध्ये प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे:
* मुंबईसह संपूर्ण कोकण: विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे.

* संपूर्ण विदर्भ: यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या ८ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

* पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि लगतचा परिसर: नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड या तालुक्यांमध्ये व आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होईल.

* इतर जिल्हे: नंदुरबार, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या १० जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तसेच सह्याद्रीच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये २१ ते २८ जुलै या आठवड्यात केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जुलै महिन्याचा अंदाज आणि सद्यस्थिती
११ ते २४ जुलै दरम्यानच्या दोन आठवड्यांत कोकण आणि विदर्भ वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १८ जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाव्यतिरिक्त कोरडे वातावरण होते. मात्र, उद्या, २१ जुलैपासून पावसाला सुरुवात होत आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रासाठी व्यक्त केलेला सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज पुढील १० दिवसांतील मध्यम ते जोरदार पावसामुळे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आणि धरणसाठा
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा-मुठा, कुकडी, कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती या नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे, त्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात जायकवाडी धरणही त्याच्या पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.