Sugarcane crushing and frp : आतापर्यंत किती साखर कारखान्यांनी एफआरपीचे पूर्ण पैसे दिले…

Sugarcane crushing and frp : राज्यात यंदा ४१५ लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट असले, तरी नोव्हेंबर पर्यंत केवळ ८५ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. यंदा निवडुकीमुळे गाळप हंगाम काहीसा लांबल्याने गाळप कमी झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीची रक्कमही अनेक कारखान्यांनी देणे बाकी आहे.

अशी आहे ऊसाची स्थिती:
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तीस लाख इतकी साधारणतः आहे. सर्व साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या दोन लाखाच्या आसपास आहे. सन 2023-24 हंगामात सहकारी तत्त्वावरील 104 व खाजगी तत्त्वावरील 104 असे एकूण 208 साखर कारखाने चालू होते. या कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता 9,51,150 (TCD) इतकी आहे.

या कारखान्यांनी हंगामामध्ये 1076.18 लाख मे.ट. इतक्या उसाचे गाळप केले आहे व 10.27% उता-याने 1101.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रात साधारणतः 40 लाख शेतकरी उसाचे पीक घेतात. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या वार्षिक उलाढाल साधारणतः एक लाख कोटीपेक्षा जास्त रकमेची आहे. राज्यातील उसाचे क्षेत्र 14.87 लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे.

यंदा किती कारखान्यांनी दिला १०० टक्के एफआरपी..

सध्या महाराष्ट्रात या हंगामात १५२ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. साखर आयुक्तालयाकडून प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत ८५.१३ लाख मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. त्या सर्वांकडून एफआरपीचे २८४८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. आतापर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत ४० टक्के एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

 राज्यातील ३० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपी दिली आहे. २ साखर कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी दिली असून ११९ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्क्यांपेक्षा कमीच एफआरपी दिली असल्याचे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे. ही एफआरपी थकबाकी १५ डिसेंबरपर्यंतची आहे. त्यानंतरची माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Leave a Reply