सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा...

सातबारा उतारा हे जमिनीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे.  कृषी क्षेत्राच्या संबंधित असलेल्या योजनांचा लाभ किंवा बँकेतून लोन घेण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा लागतो .

परंतु बऱ्याचदा सातबारा उतारा मध्ये अनेक छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात.  या चुका कधी नावा संबंधित असतात.  तर कधी शेताच्या एकूण क्षेत्राशी निगडित असतात.अशा झालेल्या चुका  पुढे खूप समस्या निर्माण करू शकतात ,परंतु आता या चुका बदलण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही.

आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून सातबारा मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. जमाबंदी आयुक्तालयाने सातबारा उतारे दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला होता.त्याला आता मान्यता मिळाल्यानंतर संबंधित प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.संगणकावर टायपिंग करत असताना सातबारा मध्ये चुका झालेल्या आहेत किंवा पूर्वी हस्तलिखित सातबारा असायची तेव्हा देखील हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक होती.  त्यामुळे अशा झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आलेला आहे.

अशा पद्धतीने होणार चुकांची दुरुस्ती.

 याकरिता संबंधितांनी ई हक्क पोर्टलवर सातबारा फेरफार यावर क्लिक करून त्या ठिकाणी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करताना जे काही आवश्यक कागदपत्रे लागतील ते अपलोड करावीत. त्यानंतर केलेला हा ऑनलाईन अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी त्या संबंधित कागदपत्रांची पुरावे तपासतो व त्याची पूर्तता तलाठ्याच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे.  व झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यते करिता पाठवली जाणार आहे.

या पद्धतीला मिळत आहे मोठा प्रतिसाद

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने हस्तलिखित व संगणक द्वारे सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया आता हाती घेण्यात आली आहे.या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  तसेच प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने सुनावणी घेऊन ते संबंधित निर्णय देण्याची निर्देश देखील सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.  विशेष म्हणजे या प्रक्रियेची जिल्हाधिकारी स्तरावर देखील नोंद ठेवली जाणार आहे.  त्यामुळे ही प्रक्रिया वेगात होईल अशी शक्यता आहे . त्यामुळे नक्कीच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 
 
चौकशी करण्याचे आदेश.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार तलाठ्याला देत असतात . पण या चुका दुरुस्त करण्यापूर्वी काहीही संबधीतांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका किंवा लेखन प्रमाणात झाल्याचे संबंधित पक्षकांनी कबूल केले पाहिजेत.
 
चुकीने नाव दाखल झाल्यास त्या व्यक्तीला तहसीलदारांकडून नोटीस…
जर आपण आपल्या सातबारावरील एखादे नाव कमी करण्याविषयी अर्ज केला असेल किंवा ज्या व्यक्तीचे चुकीचे नाव आपल्या इतर हक्कांमध्ये समाविष्ट झालेले आहे. किंवा सातबारावर त्यांचे नाव आहे. त्यावेळी तहसीलदार आपण अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तींना नोटीस बजवतात आणि त्या व्यक्तीने नाव कमी करणे विषयी कुठल्याही आक्षेप घेतला नसेल किंवा कुठलीही त्याची तक्रार नसेल तर आपली विनंती मान्य होऊन ते नाव दुरुस्त होते आणि सातबारा वरून नाव कमी केले जाते अशा प्रकारच्या सातबारे वरच्या कोणकोणत्या प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात. 
 
याविषयीची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
 
1. खातेदारांची नाव व शेरा दुरुस्ती :
सातबारा पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याचे राहून जाणे अशा प्रकारची चूक या कायद्यांतर्गत दुरुस्त करता येते. दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन होत असते ,त्यावेळी जर एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखाद्या शेरा चुकीने राहिलेला असेल तर पूर्वीचे अभिलेखात तो असेल आणि नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येते.
 
2. कलम 155 नुसार अभिलेखातील नाव कमी करणे.
सातबारा वरील काही नावे कमी करण्याचा आदेश झाला होता, परंतु त्या आदेशानुसार अशी नावे कमी करण्यात आली नाही. तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण एखाद्या अभिलेखातील नाव कमी करणे याविषयी अर्ज केला होता, परंतु तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे आदेश निर्गमित केले होते, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर अशा प्रकारच्या अंमलबजावणी आपणास 155 कलमनुसार करता येते.
 
3. कलम 32 ग नुसार मूळ मालकाचे नाव कमी करणे.
जर एखाद्या जमिनीची कुळ कायदा कलम 32 ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाला दिली असून देखील ,नंतर मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिलेले असेल ,म्हणजेच कुळ कायद्या विषयीचे हे कलम आहे 32 ग नुसार आपण मूळ मालकाला रक्कम दिली असून देखील त्यांचे नाव सातबारा मध्ये इतर हक्कात असेल तर असे नाव आपणास या कायद्यांतर्गत कमी करता येते.
 
4. कलम 155 अंतर्गत वारसाचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये दुरुस्ती
आपण जेव्हा जमिनीच्या खरेदी चे व्यवहार करतो, त्यावेळी नोंदणीकृत दस्त यामधील महत्त्वाचा मजकूर जसे की वारसाचे नाव ,जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये काही चूक झालेली असेल तर तसा उल्लेख सातबाऱ्यात झालेला असेल तर आपल्याला कलम 155 अंतर्गत अशा प्रकारची चूक दुरुस्त करता येते.
 
5. फेरफार लेखन प्रमाण यामध्ये दुरुस्ती
एखाद्या वारसाचे नाव जर सातबाऱ्यावर आलेले नसेल तर ते सुद्धा या कायद्यानुसार आपल्याला आणता येते . यावरून असे लक्षात येते की मूळ दस्तऐवजात उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तर सर्व हितसंबंधांचे म्हणणे विचारात घेऊन अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करण्यात येते.
 
6. सातबाऱ्यावरील चूक दुरुस्ती.
कधी कधी मूळ अभिलेखांमध्ये पूर्वीचे जे रेकॉर्ड असेल व त्यामध्ये जर तुमचे नाव व्यवस्थित नसेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेला आहे, ती झालेली चूक मूळच्या रेकॉर्ड मध्ये असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज करून त्या ठिकाणी सातबारावर चूक दुरुस्त करता येते. सातबारावरील ज्याचे नाव कमी होणार आहे त्याच्याशी संबंधित ती चूक असेल तर त्या सर्व हितसंबंधितांना अगोदर नोटीस दिल्या जातात आणि त्यांची जर कुठलीही तक्रार नसेल तरच अशा प्रकरणावर कार्यवाही होऊ शकते.
 
7. खरेदी व्यवहार केल्यानंतर सातबाऱ्याची नीट पाहणी करणे.
काही वेळेस खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर खरेदी करणारा स्वतःचे नाव सातबारा उताऱ्यावर दाखल झाल्याची खात्री करत नाही. म्हणजेच खरेदी केल्यानंतर आपण सातबारावर आपले नाव आले की नाही याची खात्री करत नाही, त्यामुळे खरेदी देणारा मूळ मालकाचे नाव तसेच राहते व यातून मूळ मालक फायदा घेऊन त्या जमिनीची विक्री अनेक लोकांना करू शकतात.जरी पहिल्यांदा खरेदी घेणाऱ्यांचे नाव सातबारा सदरी दाखल होणे गरजेचे असेल तरी अशा अनेक खरेदी विक्री व्यवहारामुळे पुढे अनेक प्रकारची कायदेशीर गुंतवणूक निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने आपण केलेल्या व्यवहारांची नोंद गाव दप्तरी योग्य प्रकारे नोंदवली गेली आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण एखादा व्यवहार करतो त्यावेळी सातबाऱ्यावर आपले नाव लावले आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. 
 
8. दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन.
दर दहा वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन करण्यात येते असे पुनर्लेखन झाल्यानंतर प्रत्येक खातेदारांनी सातबाराची नक्कल घेऊन आपल्याशी संबंधित सर्व नोंदी योग्य प्रकारे नोंदवल्या गेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व दरवर्षी वेळोवेळी सातबारा घेऊन सर्व नोंदणीची खातर जमा करावी व यात काही शंका असल्यास तात्काळ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
9. कागदपत्रांचे वाचन
आज सुद्धा असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी संपूर्ण सातबारा आतापर्यंत वाचलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . आपल्या शेतीचा सातबारा किंवा इतर आपल्या जमिनीशी संबंधित जे कागदपत्रे आहेत ,फेरफार अशा प्रकारच्या कागदपत्रांचे आपण व्यवस्थित वाचन केले पाहिजे. अशा प्रकारे जर तुमच्या सातबारा मध्ये जर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला कलम 155 तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून अशा प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *