बोगस बियाणे कसे ओळखायचे ,जाणून घ्या सविस्तर …

एका महिन्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला असून, यावर्षी जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाणे येऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क करण्यात आली आहेत . अनधिकृत, बोगस बियाणे कसे शेतकऱ्यांनी ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे .

जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने निवडणूक आटोपल्यानंतर ‘अलर्ट मोड’वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे . शेतकरी देखील शेती मशागतीच्या कामांकडे लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामामध्ये १ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. हा धान उत्पादक भाग असल्याने यंदाही खरीप हंगामामध्ये धानाची सर्वात जास्त १ लाख ८४ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी बियाणे, कीटकनाशके यांचे शेतकरी नियोजन करत आहेत .

बोगस बियाणे असे ओळखावे…

शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते. बीज प्रमाणीकरण यंत्रणे- कडून प्रमाणित नसलेले बियाणे, बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो.

काळजी काय घ्यावी?

अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून खते व बियाणे खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, कंपनीचे नाव ,वजन, अंतिम मुदत, संपूर्ण नमूद केलेले असावेत . कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह दिले नाही तर नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

नियंत्रण कक्षाची स्थापना..

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशकाचा पुरवठा , निविष्ठांचा काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे दिसून आले आल्यास शेतकऱ्यांनी कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार करू शकता . शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीची व समस्या सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करते वेळेस अनेक अडचणी येत असतात . जिल्हास्तरावर या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनो येथे नोंदवा तक्रार…

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. खते ,बियाणे खरेदीचे बिल मिळत नसल्यास,अतिरिक्त दराने खताची विक्री होत असल्यास , शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन निवारण कक्षात तक्रार नोंद करावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *