Important tips : विस्तारीत हवामान अंदाजानुसार मराठवाड्यात १८ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असून कमाल तापमान सरासरीइतके ते थोडेसे अधिक राहण्याची शक्यता आहे. २५ ते ३१ जुलै दरम्यान मात्र पावसाचा अंदाज सरासरीइतकाच असून तापमानात फारसा बदल होणार नाही.
सॅक-इसरो, अहमदाबादच्या उपग्रह चित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित घटलेला आहे. याचा परिणाम पिकांवरील पाण्याच्या ताणावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पीक निवड आणि व्यवस्थापनावर भर द्यावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने दिला आहे.
पेरणीसाठी सल्ला:
ज्या भागात अजून पेरणी झालेली नाही, तिथे जर ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद झाली असेल, तर सूर्यफूल, तुर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तुर (४:२), बाजरी + तुर (३:३), एरंडी, तिळ, कारळ किंवा एरंडी + धणे यांसारखी पिके घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सोयाबीन:
पिकात तण नियंत्रणासाठी आंतरमशागती करावी. पान खाणाऱ्या अळ्या किंवा उंटअळीचा प्रादुर्भाव दिसल्यास प्रोफेनोफॉस, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा इंडोक्झकार्ब यापैकी कोणतेही एक कीटकनाशक पावसाची उघडीपी पाहून फवारावे. २० दिवसानंतर तणनाशक म्हणून इमॅझोमॅक्स आणि इमीझीथीपायर मिश्रण फवारावे. पिकावर ताण असल्यास शक्य असल्यास पाणी द्यावे. एक महिना पूर्ण झाल्यास पोटॅशियम नायट्रेटची १ टक्के फवारणी आणि मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ची फवारणी करावी.
बाजरी आणि खरीप ज्वारी:
पेरणी झाल्यास आंतरमशागती करून तण नियंत्रण करावे. पाण्याचा ताण असल्यास पाणी द्यावे. एक महिन्यांनंतर ४०:२०:२० प्रमाणात खतमात्रा द्यावी. तसेच १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी उपयुक्त ठरेल. ३० जुलैपर्यंत बाजरी पेरणी करता येते.
ऊस:
पांढरी माशी व पाकोळी प्रादुर्भाव दिसल्यास लिकॅनीसिलियम लिकॅनी जैविक बुरशी किंवा क्लोरोपायरीफॉस, इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसीफेट यापैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे. इमिडाक्लोप्रिडसह २ टक्के युरियाची फवारणी देखील फायदेशीर ठरेल. पिकास ताण असल्यास पाणी द्यावे.
हळद:
आंतरमशागती करून तण नियंत्रण करावे. पाण्याचा ताण टाळावा. सूक्ष्म सिंचनाद्वारे महिन्यातून ३-४ वेळा २५ किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. आंतरपीक म्हणून लवकर काढणी होणाऱ्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत पाण्याचा ताण व कीड रोग व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं असून पीक उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठाचा सल्ला अंमलात आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












