पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते . त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल जास्त वाढला आहे . भोकरदन तालुक्यात शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी अंमलात आणला आहे.
त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याबरोबर पावसाच्या खंडातदेखील पिके चांगली येण्यास मदत होईल. या पद्धतीने सोयाबीन लागवड केल्या मुळे उत्पादनामध्ये दीडपट वाढ होण्यास मदत होईल , असा विश्वास कृषी खात्याने व्यक्त केला आहे.
मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी भोकरदन तालुक्यामध्ये शेतकरी करतात. या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. मात्र , सोयाबीन पिकाला गेल्या काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी, तर कधी कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच उत्पादनात घट होत आहे.
कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मागील वर्षभरापासून सोयाबीन लागवडीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पुढील वर्षी पट्टा पद्धतीने सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे.
लागवडीपासून ते काढणीपर्यंत खर्चाची बचत होणार..
सोयाबीन लागवड यंदा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी बीबीएफ, बेडवर, तर पट्टा पद्धतीने केली आहे. सुमारे सात हजार हेक्टरवर यंदा शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये तर वाढ होणारच आहे. शिवाय लागवडीपासून ते काढणीपर्यंत खर्चाची बचत देखील शेतकऱ्यांची होणार आहे.
आता सोयाबीन जोमात
•मी दरवर्षी जुन्या पद्धतीने सोयाबीन लागवड करीत होतो. मात्र, यंदा मी कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ सात एकरवर पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. याचा फायदा उत्पादन वाढीवर होण्यास मदत होणार आहे . आता सोयाबीन देखील जोमात आहे.
– कृष्णा पवार, शेतकरी, शेलूद.