प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सरकारकडून सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीसाठी फळपीक विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे आंबिया आणि मृगबहार बहारासाठी फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. ही योजना राज्यातील एकूण ३० जिल्ह्यांतील फळबागांसाठी लागू आहे तसेच त्यासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अत्यंत कठीण परिस्थितीतही अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे , नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट्ये आहे.
कोणत्या फळपिकांसाठी लागू असणार योजना?
आंबिया बहार – डाळिंब, आंबा, केळी,संत्रा, मोसंबी, काजू, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्त्वावर पपई व स्ट्रॉबेरी
मृग बहार – डाळिंब, लिंबू, सिताफळ,चिकू, पेरू, संत्रा, मोसंबी, व द्राक्ष (क)
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये..
◼️ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.
◼️ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी ही सदरची योजना असेल.
◼️ केंद्र शासनाने या योजनेतर्गत विमा हप्ता अनुदान ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता स्विकाण्यासाठी राज्य शासन व शेतकरी क्रमप्राप्त आहे.
◼️ राज्य शासनाने या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व स्विकारले आहे तसेच राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ३५ टक्के वरील विमा हप्ता ५०:५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.
◼️ खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सदरच्या योजनेमध्ये भाग घेण्यास पात्र आहेत. परंतु पिक विमा संकेतस्थळावर भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे.
◼️ एका वर्षात अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे . (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष) सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
◼️राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा या योजनेमध्ये राहील. तसेच ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळुन जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा प्रती शेतकरी ४ हेक्टर मर्यादपर्यंत राहील
◼️ विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी आणि विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचे बैंक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असणे आवश्यक आहे .
मोसंबी, चिकू – ३० जून २०२४
लिंबू, संत्रा, पेरु, द्राक्ष (क) – २५ जून २०२४
सिताफळ – ३१ जुलै २०२४
डाळिंब – १४ जुलै २०२४