Maharashtra rain update : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा…

maharashtra rain update : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत दक्षिण ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. आता पुन्हा एकदा वरुणराजा सक्रिय झाल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई आणि पुणे शहरातही पावसाचे पुनरागमन होणार असून पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शहरातील वाहतूक, जलनिचल व्यवस्थापन आणि सार्वजनिक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.