
Monsoon winds : राज्यात अखेर मान्सूनने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली असून हवामान विभागाने पुढील सहा दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत दरड कोसळण्याचा धोका, वाहतुकीस अडथळा आणि जलसाठ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पावसामुळे रखडलेली भातलावणी पुन्हा गती घेत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज आहे. मुंबईत पहिल्याच पावसाने 115.8 मिमीची नोंद झाली असून शहरात अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. जुहू बीचवर समुद्रात बुडणाऱ्या दोन मुलांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढल्याची घटना विशेष लक्षवेधी ठरली.
ताम्हिणी घाटाने यंदा चक्क चेरापुंजीलाही मागे टाकले असून जून महिन्यात 2,515 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा आणि मुळशीसारख्या भागांतही मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र झारखंडवर सरकत असून लवकरच मध्य भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.