
Nafed onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नाफेडतर्फे लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही ठिकाणी जुन्या कांदा गोडाऊनच्या दुरुस्तीबरोबरच नव्या चाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एकूण १२.२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
मागील अनेक वर्षांपासून नाफेडच्या कांदा गोडाऊन बंद अवस्थेत पडून होते. परिणामी, शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक करण्यासाठी खासगी चाळी किंवा बाजार समितीवर अवलंबून राहावं लागत होतं. या गोडाऊनचा उपयोग न होता ते केवळ धूळ खात पडून राहिल्याची तक्रार शेतकरी नेहमी करत होते. आता मात्र नाफेडने लासलगाव आणि पिंपळगाव या ठिकाणी जुन्या चाळींचं नूतनीकरण आणि नव्या कांदा शेड उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
या प्रकल्पांतर्गत पिंपळगाव येथे १००० टन क्षमतेचा कांदा शेड ३० एप्रिल २०२५ पर्यंत तयार होणार आहे. त्यानंतर ३१ मेपर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. कामाच्या पहिल्या टप्प्यात जुन्या गोडाऊनचे नूतनीकरण केले जाईल आणि त्याचबरोबर काही नवीन कांदा साठवण शेडही उभारले जातील.
या कामामुळे नाफेडची जुनी चाळी पुन्हा कार्यान्वित होतील आणि त्यांचा प्रत्यक्ष उपयोग शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी करता येईल. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या गोडाऊनना उर्जितावस्था मिळणार आहे.
मात्र यंदाच्या रब्बी हंगामातील कांद्याला या सुविधा वेळेअभावी उपयोगी ठरेल की कसे यावर सध्या शंका उपस्थित होत आहे कारण मे अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्यामुळे या हंगामातील साठवणुकीसाठी ही सुविधा वापरता येणार नाही. पण येणाऱ्या खरीप आणि पुढील रब्बी हंगामासाठी ही सुविधा मोठा आधार ठरेल.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना हमीभावावर कांदा विक्री करता येईल, कांद्याचा नाश कमी होईल आणि बाजारातील अनिश्चिततेला थोडा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नाफेडच्या या निर्णयामुळे लासलगाव-पिंपळगाव परिसरातील कांदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.