Nano DAP Fertilizer: नॅनो युरियानंतर (Nano Urea) इफ्फ्कोने आता नॅनो डीएपी (द्रवरूप) खत विकसित केले आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते बुधवारी (ता. २६) इफ्फ्कोच्या नॅनो डीएपी खताचे लोकार्पण करण्यात आले. ५०० मिली द्रवरुपातील डीएपीमुळे पारंपरिक ५० किलोच्या गोणीपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.
देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नॅनो युरिया व डीएपीचा वापर करण्याचे आवाहन शाह यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच खते हा शेतीचा अविभाज्य भाग आहे.
नॅनो डीएपीमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढविण्यासह जमिनीचे संवर्धन होईल. तसेच जमिनीची सुपिकता कायम राहण्यास मदत होईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
६०० रुपयांत मिळणार नॅनो डीएपी
नॅनो डीएपीची ५०० मिलीची एक बाटली ५० किलोच्या पारंपरिक दाणेदार डीएपी खताच्या समतुल्य आहे. पारंपरिक दाणेदार डीएपीच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना १३५० रुपये मोजावे लागतात. मात्र, नॅनो डीएपी किंमत केवळ ६०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने गेल्या महिन्यात याच्या वापराला मंजूरी दिली आहे. गुजरातच्या कलोलमध्ये याचे उत्पादन केले जात असून येथे प्रतिदिन ५०० मिलीच्या दोन लाख बाटल्यांचे उत्पादन होत आहे.
नॅनो युरियाच्या १७ कोटी बाटल्यांचे उत्पादन
इफ्फ्कोने २०२१ मध्ये नॅनो युरिया लाँच केला होता. तेव्हापासून मार्च २०२३ पर्यंत १७ कोटी बाटल्यांचे उत्पादन केले आहे. बाजारात नॅनो युरिया आधीपासून उपलब्ध आहे. त्यात आता नॅनो डीएपीमुळे खतांची आयातही कमी होणार आहे.
इफ्फकोने २० वर्षांचे पेटंट नोंदणीकृत केले आहे, ज्यामुळे संस्थेला जगात कुठेही द्रवरूप यूरिया आणि द्रवरूप डीएपीच्या विक्रीवर २० टक्के रॉयल्टी मिळणार असून हे एक क्रांतिकारक पाऊल असल्याचे शाह म्हणाले.