Kanda Rate : तर पुढील आठवड्यात लासलगाव, पिंपळगावला कांदा दर हजाराच्या खाली जाणार?

kanda bajarbhav : अवकाळी पाऊस, गारपीट यांच्यामुळे या आठवड्यात शेतकऱ्यांनी कांदा मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्याने त्याचा परिणाम भाव मिळण्यावर झाला. मागच्या आठवड्यात शनिवारपर्यंत लासलगाव बाजारात काहीसे १२०० रुपयांपर्यंत पोहोचलेले कांदा बाजारभाव या आठवड्यात कमी होऊन थेट हजाराच्या आसपास आले आहेत.

मागील संपूर्ण आठवडयात राज्यात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होत होती आणि परिणामी दररोज कांद्याचे बाजारभाव ५० ते १०० रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे घसरत होते. मात्र आठवडा संपत असताना ते हजाराच्या आसपास आले आहे. आवक अशीच राहिली, तर पुढील आठवड्यात हे दर हजाराच्याही खाली जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात सोमवार ५ मे २०२५ ते शुक्रवार ९ मे २०२५ या कालावधीत एकूण १६,२५,२१८ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ८,५३,६९० क्विंटल हे उन्हाळ कांदे होते. लाल कांद्याची एकूण आवक १,८७,६०३ क्विंटल तर पांढऱ्या कांद्याची आवक ८,४३४ क्विंटल इतकी होती. याशिवाय १,१९,३५९ क्विंटल स्थानिक (लोकल) कांदा बाजारात दाखल झाला.

या कालावधीत उन्हाळी कांद्याला सरासरी ९६६ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लाल कांद्याचा सरासरी दर ८८७ रुपये, तर पांढऱ्या कांद्याचा सरासरी दर १,०७१ रुपये इतका होता.

दररोजच्या एकूण कांदा आवकेचा विचार केल्यास, ५ मे रोजी ४,१२,२१८ क्विंटल, ६ मे रोजी ३,०७,३२४ क्विंटल, ७ मे रोजी ३,०५,०५६ क्विंटल, ८ मे रोजी ३,२१,५५८ क्विंटल तर ९ मे रोजी राज्यात २,५९,०६२ क्विंटल कांदा बाजारात आला.

प्रमुख बाजार समित्यांपैकी लासलगाव बाजारात ५ मे रोजी उन्हाळ कांद्याचा सरासरी दर १,०३१ रुपये होता, जो ९ मे रोजी १,०१४ रुपयांवर आला. पिंपळगाव बाजारात ५ मे रोजी सरासरी दर १,०२० रुपये होता, जो आठवड्याअखेर १,००० रुपयांपर्यंत खाली आला. नाशिकमध्ये दर १,०२६ वरून १,०१४ रुपयांवर आला. अहमदनगरमध्ये दर ८२९ वरून १,०५० रुपयांपर्यंत वाढला. पुणे बाजारात दर १,११५ वरून ९०० रुपयांपर्यंत घटला. सोलापूरमध्ये मात्र किंचित वाढ नोंदली गेली; १००० वरून ११०० रुपयांपर्यंत दर पोहोचला.

या आठवड्यात दररोज राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली, पण मागणी तुलनेत कमी असल्यामुळे दरात स्थैर्य नव्हते. काही बाजारांमध्ये किंचित वाढ तर काही ठिकाणी दर घटले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात असमाधानाचे वातावरण आहे.

या आकडेवारीनुसार, राज्यातील कांदा उत्पादन व वितरण यंत्रणा सक्रिय असून आवक मोठ्या प्रमाणात सुरळीत सुरू आहे, मात्र बाजारभाव अजूनही शाश्वत राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी बाजार हस्तक्षेप आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.