state of rain : तापमानात चढ-उतार; राज्यात पावसाची शक्यता..

state of rain : मागील २४ तासांत देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल दिसून आले. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण-गोवा परिसरातही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. पुणे, महाबळेश्वर, औरंगाबादसारख्या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस झाला.

दरम्यान ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरूवार दिनांक ९ मे पासून गारपीटीचा धोका टळला असला, तरी सोमवारपर्यंत म्हणजेच १२ मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम असणार आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमान सामान्य असून काही ठिकाणी किंचित घट झाल्याचे निरीक्षण आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली आहे. तरीही तापमान ३८ अंशांच्या आसपास असून उन्हाचा चटका कायम आहे.

मागील २४ तासांत देशातील सर्वाधिक तापमान ४२.० अंश सेल्सियस हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नोंदवले गेले. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भागात ३९ अंश, औरंगाबाद व नाशिकमध्ये ३७ अंश, विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे ३८ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. याउलट सर्वात कमी तापमान अजमेर, राजस्थान येथे १९.६ अंश सेल्सियस होते.

येणाऱ्या तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये १२ व १३ मे रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

या बदलत्या हवामानामागे पश्चिमी विक्षोभ, अरबी समुद्रातून मध्य भारतात ओढला गेलेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तर भारतात तयार झालेली वाऱ्यांची साखळी कारणीभूत आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतात उत्तर-दक्षिण दिशेने तयार झालेल्या रेषीय स्थितीमुळेही कोकण, गोवा आणि केरळ परिसरात काही प्रमाणात आर्द्रता वाढली आहे.

भारतीय हवामान विभागानुसार पुढील काही दिवस देशभरात तापमानात चढ-उतार राहणार असून काही भागांत वादळी वारे, गारपीट आणि गडगडाटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.