Agriculture Mall : आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘कृषी मॉल’

Agriculture Mall : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषी भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील.

याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतकऱ्‍यांना याचा फायदा होईल त्यांचा वेळ वाचून त्यांना सर्व कृषी माल विक्री व कृषीसाठी लागणाऱ्‍या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. ‘एक पीक एक गाव’ ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन आहे.

ॲड.कोकाटे म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठच्या कामांना तात्काळ निधी वितरीत करून या महाविद्यालयाचे काम सुरू करा.यामध्ये दिरंगाई करू नका हे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.