fertilizers and pesticide : बनावट खते आणि कीटकनाशकांविरोधात केंद्राचा लवकरच नवा कायदा…

fertilizers and pesticide

fertilizers and pesticide : केंद्र सरकार बनावट खते आणि कीटकनाशके बनवणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या दौऱ्यावेळी याबाबत संकेत दिले.

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, बनावट खते आणि कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पिकांचे उत्पादन कमी होते, खर्च वाढतो आणि अनेकदा जमीनदेखील खराब होते. अशा गंभीर समस्येकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहत असून, दोषींवर कडक कारवाई करता येईल, असा कायदा आणण्याचा सरकारचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे. त्यांना दर्जेदार आणि सुरक्षित निविष्ठा मिळतील. शेतकऱ्यांवर विश्वास ठेवून रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांना आता नियमबाह्य वर्तन परवडणार नाही.

या दौऱ्यात चौहान यांनी कृषी शास्त्रज्ञांना शेतात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. तसेच हवामान बदल, उत्पादन खर्च, निर्यात व बाजारपेठांबाबतही चर्चा झाली. द्राक्षे आणि टोमॅटोसारख्या पिकांच्या टिकाऊ जाती विकसित करण्यासाठी संशोधनावर भर देण्याची सूचना देखील त्यांनी केली.

सरकारचा हा कठोर कायदा जर लवकरच लागू झाला, तर भविष्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा बसेल आणि निविष्ठा बाजारात शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.