Groundnut cultivation : उन्हाळी भुईमूग लागवडीचे नियोजन कसे करावे ? जाणून घ्या सविस्तर …

भुईमूग हे तेलबियावर्गीय पिकांमध्ये महत्त्वाचे पीक आहे. तीनही हंगामांमध्ये भुईमूग पिकाची लागवड करता येते. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले, उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या कमी प्रमाण असते . व्यवस्थित नियोजन तसेच ओलिताची व्यवस्था केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमुगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी इत्यादी आंतरपिके घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

१५ फेब्रुवारीपर्यंत भुईमुगाची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. फुलोरा अवस्थेमध्ये दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस इतके आवश्यक असते. उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते. त्याचा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

जमीन ः

– जमीन मध्यम भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थांचे व चुना (कॅल्शिअम) प्रमाण योग्य असलेली, लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

– जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ इतका असावा.

पूर्वमशागत

– १२ ते १५ सेंमी खोल जमिनीची नांगरट करावी.

– नांगरणी केल्यानंतर उभी-आडवी पाळी घालून जमीन भुसभुशीत करावी. १० ते १५ टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या वखरणी अगोदर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे.

प्रकार ः

भुईमुगाच्या लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार निमपसऱ्या,पसऱ्या व उपट्या, असे प्रमुख प्रकार आहेत.

उपट्या (हळवे) ः

– हे वाण तीन ते चार महिन्यांत तयार होते .

– याची झाडे सरळ वाढत असतात . शेंगा झाडाच्या बुंध्यापाशी झुपक्यात धरतात .

पसरे आणि निमपसरे (गरवे) ः

– हे वाण चार ते सहा महिन्यांत तयार होणारे आहे.

– या प्रकारामध्ये झाडांच्या फांद्या जमिनीत पसरत जातात. जमिनीत जागोजाग शेंगा धरतात.

बीजप्रक्रिया ः

– रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे.

-प्रति किलो बियाणास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम हे पेरणीच्या अगोदर चोळावे. त्यानंतर प्रत्येकी २५ ग्रॅम याप्रमाणे रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक चोळावे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.

पेरणी ः

– १५ फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी.

– पेरणीपूर्वी जमीन ओलवून नंतर वाफशावर टोकण पद्धतीने किंवा ट्रॅक्टरने पेरणी करावी.

– भुईमुगाची टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागतात व उगवण चांगल्या प्रकारे होते .

– पेरणी करत असताना दोन झाडांमधील अंतर १० सेंमी ठेवावे व दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी ठेवावे .

– लागवड वरंबा, गादीवाफे या पद्धतीने करावी.

बियाणे प्रमाण ः

– टपोरे दाणे असणाऱ्या जातींसाठी १२५ किलो बियाणे , छोट्या आकाराचे दाणे असणाऱ्या जातींसाठी १०० किलो, मध्यम आकाराचे १२५ किलो तसेच वापरावे.

लागवडीसाठी वाण ः

वाण—प्रकार—पक्व होण्यास लागणारा कालावधी (दिवस)—सरासरी उत्पादन (किं/ हे.)—शिफारस.

केडीजी- १६० (फुले चैतन्य)—उपट्या—उन्हाळी—१०५ ते ११०—२० ते २४—आंध्र प्रदेश, तेलगंणा, तमिळनाडू

एस.बी.-११—उपट्या—खरीप, उन्हाळी—१०५ ते ११०, ११५ ते १२०—१२ ते १५, १५ ते २०—संपूर्ण महाराष्ट्रासाठी

टी. अे. जी.-२४—उपट्या—खरीप/ उन्हाळी—१०० ते १०५, ११० ते ११५—२० ते २५, २५ ते ३०—संपूर्ण महाराष्ट्रासाठी.

जे. एल.-२४ (फुले प्रगती)—उपट्या—खरीप—९९ ते १०४—१८ ते २०—संपूर्ण महाराष्ट्रासाठी.

टी. पी. जी.-४९—उपट्या—रब्बी/उन्हाळी—१२५ ते १३०—२५ ते ३०—जाड दाण्याची, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी, जळगाव, धुळे, व अकोला जिल्ह्यांकरिता.

फुले उन्नती—उपट्या—खरीप/उन्हाळी—११० ते ११५, १२० ते १२८—२५ ते ३०, ३५ ते ४०—संपूर्ण महाराष्ट्रासाठी

टी. जी. -२६—उपट्या—खरीप/उन्हाळी—९५ ते १००, ११० ते ११५—१५ ते १६, २५ ते ३०—संपूर्ण महाराष्ट्रासाठी

जे.एल. ५०१—उपट्या—खरीप/उन्हाळी—९९ ते १०४, ११० ते ११५—१६ ते १८, ३० ते ३२—म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे

फुले ६०२१ (आर एआरजी- ६०२१)—निमपसरी—उन्हाळी—१२० ते १२५—३५ ते ४०—पश्‍चिम महाराष्ट्रासाठी

जे. एल. ७७६ (फुले भारती)—उपट्या—खरीप/ उन्हाळी—११५ ते १२०—३० ते ३५—उत्तर महाराष्ट्रासाठी

खतमात्रा ः

– हेक्टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्वमशागतीवेळी शेवटच्या कुळवणी अगोदर जमिनीत मिसळून द्यावे.

– पेरणीच्या वेळी ५० किलो स्फुरद आणि २५ किलो नत्र या प्रमाणे रासायनिक खते द्यावीत.

– रासायनिक खतांच्या मात्रेसोबत,जिप्सम ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो व आऱ्या सुटताना २०० किलो) प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे.यामुळे अधिक उत्पादन वाढण्यासाठी उपयुक्त .
– आऱ्या सुटण्याच्या पहिल्यादा युरिया टाकू नये .

आंतरमशागत ः

– पीक २० दिवसाचे झाल्यानंतर फुले येईपर्यंत एक खुरपणी व दोन कोळपण्या करून घ्याव्यात त्यामुळे पिकामध्ये तण राहणार नाही .

– आंतरमशागतीची कामे आऱ्या निघण्याच्या अगोदर करून घ्यावी , आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी एक मोठा रिकामा ड्रम पिकावरून फिरवावा. आऱ्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.

आंतरपीक पद्धती ः

– भुईमुगाचे पीक हे कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, राजमा बाजरी, ज्वारी, व भात अशा विविध खरीप व रब्बी पिकांच्या फेरपालटीत घेता येते. भुईमुगाचे पीक बाजरी, मूग, चवळी, तीळ, सूर्यफूल इत्यादी पिकांमध्ये आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणूनही घेता येते.

– उपट्या भुईमूग वाणाची लागवड सुरू उसात आंतरपीक म्हणून करावी. यासाठी उसाची लागवड ९० सेंमी अंतरावर सरी पाडून त्यात करावी. त्यानंतर एका आठवड्याने १० सेंमी अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूंस भुईमुगाची लागवड करावी.

पाणी व्यवस्थापन ः

– पेरणीनंतर ३ ते ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगली होते .

– तुषार सिंचन पद्धतीने सिंचन करणे भुईमूग पिकांस फायदेशीर ठरते.

– पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण देणे अत्यंत गरजेचे आहे.

– पाण्याचा ओलावा पिकाच्या संवेदनशील अवस्थेत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाढीच्या संवेदनशील अवस्था ः

संवेदनशील अवस्था—दिवस

फुले येण्याची अवस्था—पेरणीनंतर २५ ते ३० दिवस

आऱ्या सुटण्याची अवस्था—पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवस

शेंगा पोसण्याची अवस्था—पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *