Rainfall : मराठवाड्यात जून महिन्यात सोयाबीन, कापूस, तुर, मूग, उडीद, ज्वारी यासारख्या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, पेरणीनंतर अनेक भागांत पावसाचा खंड निर्माण झाला असून काही ठिकाणी १५ दिवसांपेक्षा जास्त पाऊस न झाल्यामुळे उगवलेली पिके ताणाखाली आली आहेत.
या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीमार्फत शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून पावसाचा तुटवडा असताना पिकांचे रक्षण करता येईल.
१. हलकी कोळपणी करावी:
पिकांमध्ये हलकी कोळपणी केल्यास जमिनीत भेगा पडणार नाहीत आणि ओलावा टिकून राहतो.
२. आच्छादन (मल्चिंग) करावे:
दोन पिकांच्या ओळीमध्ये गवत, तुरीचा भुसा, वाळलेले तण यांचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा वाचतो.
३. पोटॅशियम नायट्रेटची फवारणी:
पिकांवर १ टक्के पोटॅशियम नायट्रेटचा द्रावण (१ लिटर पाण्यासाठी १० ग्रॅम) फवारल्यास बाष्पोउत्सर्जन कमी होते आणि पिके ताण सहन करतात.
४. तुषार सिंचन (स्प्रिंकलर):
ज्यांच्याकडे विहीर, कूपनलिका, शेततळं यामधून पाण्याची सोय आहे त्यांनी ३–४ तास दराने सिंचन द्यावे.
५. बूम स्प्रेयरने पाण्याचा फवारा:
चार दिवसांच्या अंतराने उभ्या पिकांवर पाण्याचा फवारा द्यावा, यामुळे पिके ताजीतवानी राहतात.
६. सऱ्या काढणे:
३०–३५ दिवसांनी पिकांच्या ओळीमध्ये सऱ्या काढल्यास भविष्यात पडणारा पाऊस मुरतो आणि ओलावा टिकतो.
७. रेनगन किंवा रेनपाईपचा वापर:
ज्या शेतकऱ्यांकडे रेनगन किंवा रेनपाईप आहे त्यांनी त्याचा वापर करून एका जागेवर ३–४ तास पाणी फवारावे.
८. कालव्याव्दारे सिंचन:
पाटबंधारे विभागाच्या क्षेत्रात पाणी उपलब्ध असल्यास कालव्यातून पाणी घेऊन सिंचन करावे.
९. शेततळ्यात पाणी साठवणे:
वाहून जाणारे पाणी, कालव्याचे पाणी, ओढ्याचे पाणी शेततळ्यात साठवून गरजेप्रमाणे वापर करावा.
या उपाययोजनांमध्ये ड्रोनद्वारे पाण्याची फवारणी, बूम स्प्रेयर, नॅपसॅक स्प्रेयर व पोटॅशियम नायट्रेट वापर यांचा समावेश आहे. जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी वारंवार कोळपणी करावी, असेही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सुचवतात.
पाऊस नसतानाही पिके टिकवण्याची शक्यता उपाययोजनांमुळे वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात या उपायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












