
Maharashtra weather update: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (२५ जुलै) सकाळी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आगामी दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजपासून (२५ जुलै) पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. या पावसामुळे शहरात सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी तसेच शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठवाड्यात २५ व २६ जुलैला काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील दिवसांत मात्र पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. विदर्भात २५ ते २८ जुलैपर्यंत दररोज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टीसह वीजांसह गारपीटही होऊ शकते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद पिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. कोकणात भात रोपे आणि फळबागांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी निचऱ्याची काळजी घ्यावी. घाटमाथा भागांतील धोकादायक रस्ते किंवा उताराच्या जमिनींवर भूस्खलनाचा धोका आहे.
हवामान खात्याने वाऱ्याचा वेगही ४० ते ५० किमी प्रतितास असा राहण्याची शक्यता दर्शवली असून, किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी पुढील काही दिवस समुद्रात जाणे टाळावे.
उत्तरेकडील भागांमध्येही हवामानात बदल दिसून येत असून, मध्य भारतावर केंद्रित झालेल्या निम्न दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रावरही त्याचा प्रभाव जाणवत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात ढगाळ वातावरण, वीजा चमकण्यासह जोरदार पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने पुढील उपाय योजावेत:
* भात, सोयाबीन, मका, तुर आणि भाजीपाला पिकांमध्ये पाण्याचा निचरा करा.
* उभ्या फळझाडांना किंवा वेलवर्गीय पिकांना आधार द्या.
* कापसामध्ये पानावरील बुरशी व कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर तज्ञांच्या सल्ल्याने करावा.