
Rain update : भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत असून, देशभरात 106 टक्क्यांहून अधिक पाऊस पडू शकतो. ऑगस्टमध्ये मात्र पावसात काहीशी उसंत असली तरी सरासरी म्हणजे 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज आहे. 1971 ते 2020 या कालावधीत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांची सरासरी 422.8 मिलिमीटर आहे. यंदा त्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्ये, पूर्व भारत, लडाख, मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवरील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाची स्थिती एल-निनोच्या तटस्थ अवस्थेत असून, या स्थितीचा परिणाम मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातही दिसून येईल. वर्षाच्या उत्तरार्धात ‘ला-निना’ स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. तसेच, हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल (IOD) देखील सध्या तटस्थ आहे, मात्र उर्वरित हंगामात ही स्थिती ऋणात्मक होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पावसाबाबत बोलायचे झाल्यास, देशात सरासरी म्हणजे 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज आहे, जरी काहीशी उघडीप संभवत असली तरीही. 1971 ते 2020 दरम्यान ऑगस्टची सरासरी 254.9 मिमी इतकी होती. या वर्षी ऑगस्टमध्ये मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्वोत्तर भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर मध्य भारताचा दक्षिण भाग, पूर्व भारत आणि वायव्य भारताच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने चिंतेचा ठरण्याची शक्यता आहे, कारण जुलैमध्ये सरासरी पावसाचे प्रमाण गाठल्यानंतर मॉन्सून काहीसा मावळत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत पावसाचा खंड राहण्याची शक्यता असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांव्यतिरिक्त उर्वरित राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीसह जलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, ऑगस्टच्या उत्तरार्धात पावसात वाढ होण्याची शक्यता असून, सप्टेंबरमध्ये पावसाचे पुनरागमन अपेक्षित आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात कमाल तापमान सरासरीइतके तर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने संपूर्ण भारतात तालुकास्तरावर पावसाच्या अचूक निरीक्षणासाठी ‘ब्लॉकवाईज रेनफॉल मॉनिटरिंग सिस्टीम’ (BRMS) नावाची योजना सुरू केली आहे. ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून, देशातील सुमारे 7200 तालुक्यांमध्ये वास्तव वेळेत (real-time) पावसाची माहिती मिळवता येईल. या तंत्रज्ञानामुळे पावसाच्या मोजणीतील अचूकता वाढणार असून, आकडेवारी अधिक सुस्पष्ट व विश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार आहे. शेती, जलव्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले.