Onion rate : पारनेर बाजार समितीत कांदा गोण्यांची विक्रमी आवक; ९४ हजारांहून अधिक गोण्या, लिलाव तिसऱ्यांदा रद्द…

Onion rate : पारनेर बाजार समितीच्या आवारात कांदा गोण्यांची आवक दिवसेंदिवस वाढत असून, मागील पंधरा दिवसांत संगमनेर, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा व नगर तालुक्यांतून सुमारे चार हजार मालट्रक कांदा दाखल झाल्याने तिसऱ्यांदा लिलाव रद्द करावा लागला. रविवारी (दि. ११) एकाच दिवशी ९४ हजार ४३६ कांदा गोण्यांची नोंद झाली. शेतीमालाला मिळणारा रास्त भाव आणि पारदर्शक कारभार यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या विश्वासाने येथे विक्रीसाठी माल आणत असल्याचे सभापती किसनराव रासकर व सचिव सुरेश आढाव यांनी नमूद केले.

गेल्या पंधरा दिवसांत जवळपास प्रत्येक लिलावात ५० हजारांहून अधिक कांदा गोण्यांची आवक होत असून, काही वेळा ही संख्या ९४ हजारांपर्यंत पोहोचली आहे. बाजार समितीच्या आवारात जागेची व हमालांची कमतरता, तसेच प्रचंड आवक यामुळे सर्व गोण्या हाताळणे कठीण झाल्याने लिलाव पुढे ढकलण्याची वेळ येत आहे. रविवारी झालेल्या लिलावात ५ ते १० वक्कल कांद्याला प्रतिकिलो १८ ते २० रुपये, १ नंबर वक्कलला १४ ते १७ रुपये, २ नंबर वक्कलला ११ ते १३ रुपये, तर ३ नंबर वक्कलला ६ ते १० रुपये असा भाव मिळाल्याची माहिती माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली.

राज्यात कांदा विक्रीसाठी पारनेर बाजार समितीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून, पारदर्शक कारभारामुळे शेतकरीवर्गाचा या ठिकाणी मोठा विश्वास बसला आहे. कांद्याच्या खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. याच परिणामस्वरूप बाजार समितीकडे सध्या सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या मुदत ठेवी जमा झाल्या असून, ही बाब संस्थेच्या सक्षम व विश्वासार्ह कार्यपद्धतीचे प्रतीक मानली जात आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने वीजपुरवठ्याच्या दृष्टीने स्वयंपूर्णतेचा निर्णय घेत छतावर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असलेला सोलर प्रकल्प उभारला असून, त्यामुळे दरमहा येणाऱ्या सुमारे ६० हजार रुपयांच्या वीजबिलात मोठी बचत झाली आहे. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून बाजार समिती नफ्यात आली असून, त्याचबरोबर शेतकरी हिताला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व सुविधा व सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.