Minister of Agriculture : रमीचा डाव महागात; कोकाटेंना क्रीडा खाते, कृषी खात्याची धुरा भरणेंकडे..

Minister of Agriculture : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या बदलांमुळे राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. या फेरबदलांतर्गत दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, माणिकराव कोकाटे यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग देण्यात आला आहे.

कृषी खाते हे राज्याच्या आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे भरणे यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. दत्तात्रय भरणे यांचा राजकीय कारकिर्दीचा प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. श्रीमंत शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरणे यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

➡️१९९२ मध्ये त्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून प्रवेश केला आणि पुढे १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडून आले.
➡️२००० मध्ये त्यांनी बँकेचे प्रमुख पद भूषवले आणि २००२ मध्ये साखर कारखान्याचेही प्रमुख झाले.
➡️त्यांनी स्थानिक विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे इंदापूर मतदारसंघात त्यांचे बळ वाढले आणि त्यांनी तिथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला.
➡️२०१४ मध्ये प्रथमच विधानसभेत प्रवेश करत त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
➡️२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवेळी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून पक्षाच्या नव्या नेतृत्वाला पाठिंबा दिला.

सध्या ते इंदापूरचे आमदार असून, यापूर्वी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. कृषी खात्याची धुरा त्यांच्याकडे येणे म्हणजे राज्याच्या कृषी विकासासाठी नव्या धोरणात्मक संधींचा प्रारंभ होऊ शकतो, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.