kanda bajar bhav : उत्तरेकडील श्रावण संपणार; कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

Kanda bajarbhav : उत्तर भारतात श्रावण महिना यंदा ९ ऑगस्टला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सध्या घसरलेले कांदा बाजारभाव पुन्हा सावरतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते, तर दुसरीकडे दिल्लीच्या आझादपूर मंडीतील कांदा व्यापारीही हीच शक्यता बोलून दाखवत आहेत.

सध्या नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, सोलापूर अशा प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांत बाजारभाव क्विंटलमागे १००० ते १३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मागील काही आठवड्यांत बाजारात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामातील कांदा आल्याने दर घसरले आहेत. पावसाळ्यामुळे साठवलेला कांदा खराब होण्याचा धोका असल्याने शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परिणामी पुरवठा वाढला आणि भाव पडले.

मात्र उत्तरेकडील धार्मिक कुटुंबांत श्रावण महिन्यात कांदा, लसूण, मांसाहार यांचे सेवन टाळले जाते. त्यामुळे या काळात तिकडे कांद्याची मागणी घटते. यावर्षी उत्तर भारतात श्रावण ९ ऑगस्टला संपतो, तर महाराष्ट्रात श्रावण २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये ९ ऑगस्टनंतर हळूहळू कांद्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या आजादपूर बाजारातील काही घाऊक कांदा व्यापार्‍यांनी यासंदर्भात मत व्यक्त करताना सांगितले की, श्रावण संपल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि घरगुती वापरासाठी कांद्याची मागणी पूर्वपदावर येते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतून उत्तरेत माल रवाना होण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्यास दरात २०० ते ३०० रुपये क्विंटल इतकी सुधारणा होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे मात्र कांदा विकावा किंवा साठवावा याबद्दलचा कुठलाही सल्ला किंवा आग्रह कृषी २४ देत नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवरच निर्णय घ्यायचा आहे.

एकूणच उत्तरेकडील श्रावण संपल्यानंतर मागणी वाढल्यास सध्याच्या निराशाजनक बाजारभावाला थोडासा दिलासा मिळू शकतो. कांदा उत्पादकांनी बाजारपेठेतील हालचालींवर लक्ष ठेवून योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेणे गरजेचे आहे.