Advice for sowing : मराठवाड्यात पेरण्या लांबल्या; सोयाबीन, कापसाच्या पेरणीसाठी सल्ला..

Advice for sowing : मराठवाडा विभागात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणी लांबली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतून 11 ते 24 जुलै 2025 या कालावधीसाठी हवामानाचा आणि पेरणीयोग्य परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा सल्ला जारी करण्यात आला आहे.
 

11 ते 17 जुलै या आठवड्यात मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमानही सरासरीपेक्षा किंचित कमी राहील, तर किमान तापमान सरासरीच्या आसपास राहील. यानंतर 18 ते 24 जुलै या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण सरासरीइतके राहण्याचा अंदाज आहे आणि कमाल तसेच किमान तापमानामध्येही फारसा फरक राहणार नाही.

इसरोच्या सॅक, अहमदाबाद या संस्थेच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जन छायाचित्रांनुसार मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. याचा अर्थ जमिनीतील आर्द्रता कमी आहे आणि पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने शेतकऱ्यांना सूचित केले आहे की, ज्या भागांमध्ये पेरणी अद्याप झालेली नाही, तिथे 75 ते 100 मिमी इतका पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

सर्वसाधारणपणे मूग, उडीद, भुईमूग आणि इतर खरीप पिकांची पेरणी 15 जुलैपर्यंत करणे योग्य असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची उघड व प्रमाण याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. सोयाबीनच्या पेरणीसाठीही हेच तत्त्व लागू असून बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीनची पेरणी केली आहे त्यांनी अंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. कीड नियंत्रणासाठी उपलब्ध कीटकनाशकांचा वापर पावसाची उघड मिळाल्यानंतरच करावा.

खरीप ज्वारी आणि बाजरीची पेरणीही पावसावर अवलंबून आहे. बाजरीची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. दोन्ही पिकांमध्ये तण नियंत्रण, आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा. हळद घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यांपर्यंत काढणी होणारी आंतरपिके जसे की पालेभाज्या यांचा समावेश करावा.

ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याचे जैविक किंवा रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन करावे. पावसामुळे पिकांना ताण येत असल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.

पावसाचा खरा जोर अजून सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवणे आणि हवामान विभागाच्या व कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार योग्य वेळची वाट पाहणे हेच हिताचे ठरेल. त्यामुळे पेरणीत घाई न करता योग्य प्रमाणातील पावसानंतरच कामे करावीत, असा स्पष्ट संदेश तज्ज्ञांनी दिला आहे.