महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना पदवीधरापर्यंत शिक्षण करण्याकरिता पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे घोषित केले आहे. ज्या मुलांना मुलींना पाच ते दहा लाखापर्यंत कर्ज घ्यायचे आहे, त्यांना दोन टक्के व्याजदर आणि दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी चार टक्के व्याजदराने कर्ज या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येईल.
राज्य बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्ज योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. राज्य बँकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा राज्य बँक ही कणा आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी या योजनेमार्फत आपले शिक्षण पूर्ण करावे असे आव्हान केले आहे. आजपर्यंतच्या बँकेच्या यशस्वी वाटचालीचे सर्व श्रेय बँकेच्या सेवकवर्गाचे असल्याचे बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले . विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर,माजी मंत्री विजय शिवतारे , आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. दिलीप दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.व डॉ. तेजल कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.
‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’
1. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींनी या योजनेमार्फत आपले शिक्षण पूर्ण करावे असे आव्हान केले आहे.
2. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींना कर्ज घेण्यासाठी काही तारण ठेवण्याची किंवा प्रक्रिया शुल्क देण्याची गरज नाही.
3.तसेच कर्ज घेण्यासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नाही.
4.ज्या मुलांना 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत त्या मुलांना 50 हजार रुपये रोख मिळतील.
5. तसेच जे मुलांना 90% गुण मिळाले आहेत त्यांना एक लाखापर्यंत रोख रक्कम दिली जाईल.
6. या योजनेचा लाभ फक्त 2023 च्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबालाच मिळणार आहे
बारावीनंतर कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार
वर्ष आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
– 1995 ते 2015 – 60 हजार 750
– 2016 – 2 हजार 722
– 2017 – 2 हजार 426
– 2018 – 2 हजार 658
– 2019 – 2 हजार 567
– 2021 – 2 हजार 498