
Decision of State Govt : राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय (जीआर) अखेर जाहीर केला असून, विविध घटकांसाठी ठोस आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.
या जीआरनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये, तर अपंगत्व आल्यास ७४ हजार ते २.५ लाख रुपये पर्यंत मदत मिळणार आहे. जखमी व्यक्तींना, घर पडझड, जनावरे मृत्यू, शेतीपीक, जमीन, गोठे, झोपड्या आणि मत्स्य व्यवसायाचे नुकसान यासाठीही वेगवेगळ्या दराने आर्थिक सहाय्य निश्चित करण्यात आले आहे. शेती नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १८,५०० ते ३२,५०० रुपये, तर जमीन वाहून गेल्यास ४७,००० रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येईल.
जनावरांच्या नुकसानीसाठी दुधाळ जनावरांना ३७,५०० रुपये, ओढकाम जनावरांना ३२,००० रुपये, लहान जनावरांना २०,००० रुपये, तर शेळी/मेंढींसाठी ४,००० रुपये आणि १०० रुपये प्रतिकोंबडी मदत जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात खत आणि बियाणे घेण्यासाठी प्रतिहेक्टर १०,००० रुपये (३ हेक्टरपर्यंत) थेट बँक खात्यात जमा केले जातील. मनरेगा योजनेअंतर्गत शेतजमीन पुन्हा लागवडीसाठी प्रतिहेक्टर ३ लाख रुपये पर्यंत मदत मिळणार आहे.
शासनाने जमीन महसुलात सूट, कर्ज पुनर्गठन, एक वर्षाची कर्ज वसुली स्थगिती, वीज बिल माफी, परीक्षा शुल्क माफी, तसेच दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी फी माफी अशा विविध सवलतींचीही घोषणा केली आहे. तातडीच्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी १० हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि ऊर्जा विभागांमार्फत कामे राबवली जातील.
विशेष म्हणजे या जीआरमध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत चर्चा सुरू झाली आहे. तरीही, एकूण ३२ जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेसाठी आश्वासक ठरणार आहे.
शासन GR खालीलप्रमाणे :
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202510091904513519.pdf