
Crop care : लवकच खरीपाचा हंगाम सुरू होत असून कापूस, तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
कापूस पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये.
कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी. तूर पिकाच्या लागवडीसासठी मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही.
पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भूईमूग पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीची निवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनीची निवड करावी.