Weather warning : सावधान ! राज्यात शनिवारपर्यंत अवकाळीचा इशारा; मात्र पेरणीची घाई नको..

Weather warning : महाराष्ट्रात गुरुवार २२ मेपासून ते शनिवार २४ मेपर्यंत अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाचा सर्वाधिक प्रभाव दुपारनंतर जाणवण्याची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील व विजांच्या कडकडाटासह पावसाचे सत्र सुरू राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागांमध्ये हा पाऊस सोमवारी २६ मेपर्यंत कायम राहू शकतो.

या पावसाच्या कारणांबाबत माहिती देताना श्री खुळे यांनी सांगितले की, अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीय वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. या वाऱ्यांची दिशा उत्तरेकडे असून, त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर दिसून येत आहे.

पावसाचे हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र २९ मेपासून हवामानात सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. मान्सूनचे केरळात आगमन होणे आणि त्यानंतर महाराष्ट्रात कधी पोहोचतो यावर पुढील हवामान ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या आधारावर आगाप पेरणी करण्याच्या विचारात असू नये, असा स्पष्ट सल्ला खुळे यांनी दिला आहे. पावसाची सध्याची स्थिती भासायला चांगली वाटत असली, तरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा करणं आवश्यक आहे. सध्या शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाकडे लक्ष द्यावे. कपाशी व टोमॅटो लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीच पुढे जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अवकाळी पावसामुळे शेतीस लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र खरीप हंगामासाठी निर्णय घेताना योग्य वेळ आणि पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करूनच पाऊल उचलावे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.