
Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पुढील हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असून, सरकारने या योजनेसाठी पुढील टप्प्यात ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
‘लाडकी बहिण योजना’ ही राज्य सरकारची महिला सक्षमीकरणासाठीची महत्त्वपूर्ण योजना असून, मार्च २०२४ पासून राज्यभरात ती राबवली जात आहे. योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील सर्वसामान्य, गरीब, मागास व अल्पभूधारक कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परितक्त्या महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात दिले जातात. यासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया, आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो महिलांनी नोंदणी केली असून, पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शासनाने यास दुजोरा दिला आहे. लवकरच हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, ३० जूनपासून सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा केली जाईल. कोणतेही विधेयक चर्चेविना मंजूर होणार नाही, अशी शासनाची भूमिका राहणार आहे. यासोबतच विविध पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्या आजच सभागृहात सादर केल्या जातील.
‘लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात काही तांत्रिक अडचणी, अपात्र अर्जदार आणि नोंदणीतील उणीवा यामुळे काही महिलांना लाभ मिळण्यात विलंब झाला होता. मात्र, शासनाच्या दुरुस्ती प्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा पुढील हप्त्याची वाट मोकळी झाली आहे.
शेतकरी, मजूर, गृहोद्योग करणाऱ्या महिला तसेच ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना आर्थिक आधार ठरत असून, महिलांच्या हातात थेट रोख रक्कम मिळाल्यामुळे त्या आपल्या दैनंदिन गरजांकरिता ती वापरू शकतात. त्यामुळे लाडकी बहिण योजना केवळ एक आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या स्वावलंबनाची दिशा ठरत आहे.