
Crop cultivation : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने १९ जून रोजी दिलेल्या कृषि सल्ल्यानुसार, मराठवाड्यात जून अखेरपासून पावसाची नियमितता अपेक्षित असून शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्वतयारी व बियाण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी.
दरम्यान मराठवाड्यासह राज्यात काही तालुक्यात पेरणी योग्य पाऊस म्हणजेच सुमारे ७५ ते १०० से.मी झालेला आहे, तेथील शेतकऱ्यांनीच शेतातील वाफसा पाहून पेरणीचा निर्णय घ्यावा असेही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
कापसाची लागवड करायची असल्यास कोरडवाहू बिटी कापूस १२० बाय ४५ सें.मी. अंतरावर लावावा. यासाठी प्रति हेक्टर २.५ ते ३ किलो बियाणे लागते. कापूस लागवडीसाठी १५ जुलैपर्यंतचा कालावधी योग्य असून, बियाण्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी सुडोमोनास फ्ल्युरोसन्स १० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. बियाण्यात ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक १० मिली प्रमाणात मिसळल्यास उत्पादनात वाढ होते.
तूर लागवडीसाठी शेताच्या चारही बाजूने तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद असे चर खोदावेत. यामुळे अतिवृष्टीत मातीचे धूप व मुळांचे कुजणे टाळले जाईल. कोरडवाहू तूर ९० बाय २० ते ३० सें.मी. अंतरावर तर बागायती टोकण पद्धतीने ९० बाय ९० सें.मी. अंतरावर लावावी. बियाण्याच्या प्रक्रीयेसाठी कॅप्टन २० ग्रॅम, थायरम २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम १५ ग्रॅम प्रति १० किलो बियाणे वापरावे. रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा यांचेही मिश्रण बियाण्यावर लावल्यास मूळ वाढ व अन्नद्रव्य उपलब्धतेत मदत होते.
मूग व उडीद यांची पेरणी ३० बाय १० सें.मी. अंतरावर करावी. प्रति हेक्टर १२ ते १५ किलो बियाणे आवश्यक आहे. पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी. बियाण्यास कार्बेन्डॅझीम १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा १० ग्रॅम व रायझोबियम, पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यावर प्रक्रिया करावी.
भुईमूग लागवडीसाठी उपट्या जातींसाठी ३० बाय १० सें.मी. व पसऱ्या जातींसाठी ४५ बाय १५ सें.मी. अंतर योग्य आहे. लागवडीसाठी उपट्या जातींसाठी १०० ते २०० किलो व पसऱ्या जातींसाठी ८० किलो बियाणे लागते. थायरम किंवा कार्बेन्डॅझीम + मॅन्कोझेब या मिश्रणाने बियाण्याची प्रक्रिया करावी.
मक्याची पेरणी ६० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी. प्रति हेक्टर १५ किलो बियाणे वापरावे. सायॲन्ट्रानिलीप्रोल + थायामिथॉक्झाम या कीटकनाशकांचे मिश्रण ६ मिली प्रति किलो बियाण्यावर वापरल्यास अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाण्यावर थायरम २.५ ग्रॅम व ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम यांची प्रक्रियाही उपयुक्त ठरते.
एकंदरीत, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीपूर्व नियोजन, योग्य अंतर ठेवून लागवड व शिफारशीनुसार बिजप्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होईलच, शिवाय कीड व रोगांपासूनही बचाव होईल. शेतकऱ्यांनी वेळ न दवडता शिफारशीचे पालन करावे असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.