शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी ,सुरु होतोय हा मोठा प्रकल्प,जाणून घ्या सविस्तर ..

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी पुणे विभागात १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट  सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते.

यामुळे आता पहिल्या टप्प्यामध्ये सातारा, सांगली ,पुणे, सोलापूर, व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १ हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉटच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार आहे .

पुणे विभागातील ७१० उपकेंद्रांद्वारे मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेत (२.०) शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५ हजार ९१५ मेगावॉट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य आहे तसेच , आतापर्यंत सात हजार ६६९ एकर शासकीय जमिनीचे अधिग्रहण केले आहे .

यामध्ये शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये २७६ उपकेंद्रांद्वारे १ हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

पहिल्या टप्प्यातील २७६ उपकेंद्रांच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायत व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ सांगली ४१ उपकेंद्रांसाठी ३१७ मेगावॉट, पुणे जिल्ह्यात ५४ उपकेंद्रांसाठी ४२९ मेगावॉट, सोलापूर जिल्ह्यातील ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉट आणि कोल्हापूर ४४ उपकेंद्रांसाठी १७० मेगावॉट असे २७६ उपकेंद्रांसाठी १९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीकडून सुरू करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतिवर्ष पाच लाख असे ३ वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते . विशेष म्हणजे, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ते २५ वर्षे चालवणे आणि देखभाल व दुरुस्ती करणे याद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात अंदाजे ६ हजार पूर्णवेळ, तर १३ हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होतील. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित केले जातील, अशा ग्रामपंचायतींना अंदाजे २०० कोटींपेक्षा जास्त अनुदान दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *