मुंबई, ठाणेसह राज्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यात पुन्हा संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.लॉ कॉलेज रोड, डेक्कन, घोले रोड, एसबी रोड परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. 11 जूनपर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी..
वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा आज चौथ्या दिवशी अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. मंगरूळपीर ,मालेगाव, वाशिम, आणि रिसोड, या भागामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता ज्या भागात चांगला पाऊस पडला त्या भागामध्ये पेरणीला वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे .
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर…
धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यातील फकीरानगर,समर्थ नगर, वैराग नाका , गणेश नगर, परिसरात गटारांना नदीचं स्वरूप आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे धाराशिव मधील शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. . पावसाचे आगमन झाल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहिल्याच पावसामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले…
धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसात फकीरा नगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात बुडाल्या व नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे.घरामध्ये ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यामध्ये भिजल्यामुळे ज्वारी आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी लोक आपल्या घरातील पाणी बादलीने उपसून बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
अंतरवाली सराटीसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी..
जालना येथे अंतरवाली सराटीसह परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस बरसला. उकाड्याने हैराण नागरिकांना या पावसाने चांगला दिलासा मिळाला आहे व परिसरात या मोसमातील पहिला जोरदार पाऊस झाला. दरम्यान पेरणीसाठी शेतकऱ्यांची रान तयार असून आणखी दमदार पावसाची शेतकरी वाट पाहत आहे .