द्राक्षाच्या उत्पादन चक्रामध्ये दोन टप्पे असतात . खरड छाटणी त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे सध्या या छाटणीचा हंगाम चालू आहे. द्राक्षाची प्रत आणि उत्तम दर यासाठी खरड छाटणीनंतर येणाऱ्या एकसारख्या फुटी महत्त्वाच्या असतात. तर यांसाठी काय उपाययोजना आहेत याची आपण माहिती घेऊया .
पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा द्राक्ष वेलींवर एक प्रकारचा ताण असतो. तो तसाच असतानाच खरडछाटणी केल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.तसेच या कालावधीत तापमान खूप असल्यामुळे अंतर्गत चयापचय क्रियेचा वेग हा मंदावतो. पाण्याची कमतरता व तापमान खूपच जास्त राहणे या दोन्ही कारणामुळे नवीन फुटी जळण्याची शक्यता असते . अशा अवस्थेत एकसारख्या फुटी निघण्यासाठीचे पुढील प्रमाणे घटक आहेत .
१) शेडनेटचा वापर, २) वेलीतील अन्नद्रव्यांची साठवणूक, ३) तापमान, ४) वेलीवरील ताण, ५) पाणी, ६)वेलीची विश्रांती, ७)आर्द्रता, ८) शेडनेटचा वापर, इ.
उपाययोजना –
१. एकसारखी फूट निघण्यासाठी हायड्रोजन सायनामाइड २० ते ३० मि.लि प्रतिलिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे.तापमान कमी झाल्यानंतरच हे पेस्टिंग करावे. अन्यथा डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. यापेक्षा जास्त प्रमाणात पेस्टिंगची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवावे.
2. यासाठी ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हानिकारक समजले जाते. त्यासाठी बरेच द्राक्ष बागायतदार बागेच्या बचावासाठी कापडाचा तसेच शेडनेट चा वापर करतात . फळछाटणीच्या वेळेस शेडनेट टाकले असल्यास ते लगेच हटवू नये . त्यामुळे शेडनेटमधील वेलींना लवकर व एकसारख्या फुटी निघत असल्याचे पाहण्यात आले आहे . कमीत कमी सात ते आठ दिवस आधी सावलीतील फुटी फुटतात.
3. उन्हाळा असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे ,त्यामुळे द्राक्षबागेवर पाण्याचा ताण पडत नाही . पूर्ण वाफसा मुळांच्या कार्यक्षेत्रात राहील याची काळजी घ्यावी.छाटणी केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी रोज सकाळी व संध्याकाळी पाण्याची फवारणी करावी. त्यामुळे ओलांड्यांवर आर्द्रता निर्माण होईल. एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.
4. पांढऱ्या मुळीची वाढ क्षारांच्या सानिध्यात योग्य प्रकारे होऊ शकत नाही.गंधक पावडर ५० किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी त्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यास मदत होते . काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचरा करून घ्यावा. त्याचा पांढऱ्या मुळांच्या वाढीसह फुटीवरदेखील चांगला परिणाम होतो.
५. मशागतीची कामे खरड छाटणीच्या आधी पूर्ण करावीत. त्यात प्रामुख्याने खतांचे नियोजन व बोद यांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण योग्य ती काळजी घेऊन खरड छाटणी केली तर येणाऱ्या अडचणींवर मात करता येऊ शकते.