kanda market prices : या आठवड्यात कांदा बाजारभावाचा कसा होता ट्रेंड? वाढले की घसरले?

kanda market prices

देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा समावेश होतो. यापैकी मध्य प्रदेशमध्ये कांद्याचा दर आठवड्याभरात १६८० रुपयांवरून १५५७ रुपये झाला आहे. गुजरातमध्येही किंमतीत घट झाली असून, कर्नाटकमध्ये दर स्थिर आहेत. राजस्थानमध्ये दर किंचित वधारलेले दिसले. मात्र, सर्वसाधारणपणे देशभरात घसरणीचा कल दिसून आला आहे.

राज्यात काय आहे स्थिती:
महाराष्ट्रात दोन आठवड्यांच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सरासरी ११ टक्क्यांची घट झाली आहे. शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा बाजारात आणत असल्याने बाजारात पुरवठा वाढला आहे. सोलापूरमध्ये उन्हाळी कांद्याचा दर १३.५३ टक्क्यांनी घसरला असून २४ एप्रिलला ९८३ रुपये दर असताना तो १ मे रोजी ८५० रुपये झाला. सांगलीमध्येही किंमतीत ६.२८ टक्के घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दर ८४० वरून ७६५ रुपये झाले. नाशिकमध्ये अन्य प्रकारातील कांदा म्हणजेच उन्हाळी कांदा ११०२ वरून १०३८ रुपयांवर आला. पुण्यातही ९९८ वरून ९६३ रुपये दर नोंदवला गेला.

राज्यात काही बाजारांमध्ये दर वाढले आहेत. नागपूरमध्ये उन्हाळी कांद्याचा दर ६५ टक्क्यांनी वाढून १२०८ वरून २००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साताऱ्यातही अन्य प्रकारातील कांदा १५ टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, हे अपवाद असून बहुतांश बाजारांमध्ये दर घसरलेले आहेत.

सध्या बाजारात उन्हाळी कांद्याचीच प्रमुख आवक सुरू आहे. हा कांदा टिकाऊ असल्याने व्यापाऱ्यांकडून साठवणूक केली जाते. पण सध्या नाफेड आणि राज्य सरकारांच्या खरेदीला अपेक्षित वेग न मिळाल्यामुळे बाजारभाव दबावात आहेत. शेतकरी वर्गात यामुळे नाराजी असून, दर सावरण्यासाठी तातडीने खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.

कांद्याच्या दरात पुढील काळात स्थिरता येण्यासाठी हवामान, आवक आणि सरकारी खरेदी धोरण महत्त्वाची भूमिका बजावतील. दर सध्या घसरले असले तरी साठवणूक योग्य वेळी केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात चांगले दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.